मावळच्या आभाळावर हायटेन्शन’चे सावट; पॅराग्लायडिंग उद्योग धोक्यात
कामशेत : साहसी पर्यटनाच्या नकाशावर जागतिक ओळख निर्माण करणाऱ्या मावळ तालुक्यातील कामशेत परिसरावर आता उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचे संकट घोंगावत आहे. प्रस्तावित हायटेन्शन लाईनमुळे पॅराग्लायडिंगच्या उड्डाण मार्गांवर मोठा परिणाम होणार असल्याने हजारो युवकांच्या रोजगारावर गंडांतर येण्याची भीती व्यक्त होत आहे.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कामशेतने गेल्या दोन दशकांत पॅराग्लायडिंग क्षेत्रात वेगळी छाप निर्माण केली आहे. देश-विदेशातील पर्यटक, मावळ च्या भूमीमधे दाखल होत असतात. प्रशिक्षणार्थी आणि साहसी खेळाडूंसाठी मावळ ची भूमी विशेष तर कामशेत व नाने मावळ हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. येथील टेकड्या, अनुकूल वाऱ्यांचा वेग आणि सुरक्षित उड्डाण क्षेत्रामुळे कामशेतला भारताची पॅराग्लायडिंग राजधानी म्हणूनही ओळख मिळाली आहे.
विशेष म्हणजे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या खेळाचे प्रशिक्षण आणि अनुभव घेण्यासाठी मावळ तालुक्याला भेट दिली होती. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरही या परिसराची मोठी चर्चा झाली होती.
मात्र, आता प्रस्तावित उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांमुळे उड्डाणासाठी वापरल्या जाणाऱ्या हवाई मार्गांमध्ये अडथळे निर्माण होणार आहेत. पॅराग्लायडिंग प्रशिक्षक, रिसॉर्ट व्यावसायिक, वाहनचालक, फोटोग्राफर, स्थानिक विक्रेते आणि पर्यटनाशी निगडित हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर याचा थेट परिणाम होणार असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
स्थानिक ग्रामस्थ आणि पॅराग्लायडिंग संस्थांनी प्रशासनाकडे पर्यायी मार्गाचा विचार करण्याची मागणी केली आहे. विकास हवा; मात्र रोजगार हिरावून घेणारा नव्हे, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, मावळच्या आकाशात मुक्त भरारी घेणाऱ्या पॅराग्लायडिंग उद्योगाचे पंख छाटले जाणार की शासन पर्यायी तोडगा काढणार, याकडे आता संपूर्ण पर्यटन क्षेत्राचे लक्ष लागले आहे.






