भारतीय ज्ञान परंपरेत जीवनाचे पॅकेज तयार होते : पद्मविभूषण सुमित्रा महाजन. मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेला सुरुवात

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

ज्याला स्वतःची बुद्धीच नाही त्याला कितीही शास्त्र, ज्ञान सांगून उपयोग नाही. आंधळे बनून ज्ञान ग्रहण करता येत नाही. भारतीय ज्ञान परंपरेत जीवनाचे पॅकेज तयार होते. आपली राष्ट्रीय संपत्ती जपता आली पाहिजे. भारताला लाभलेली समृद्ध ज्ञान परंपरा आज सगळया जगाला दिशादर्शक ठरत आहे. या ज्ञान परंपरा, वारसा आजच्या पिढीने जतन करुन ठेवला पाहिजे. समाजासाठी काम केल्याने जो सन्मान मिळतो, त्याला तोड नाही, असे प्रतिपादन लोकसभेच्या माजी अध्यक्षा पद्मविभूषण सुमित्रा महाजन यांनी केले.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने आयोजित मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प सुमित्रा महाजन यांनी गुंफले. कार्यक्रमात साहित्य क्षेत्रात योगदानासाठी ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे यांना व सांप्रदायिक क्षेत्रासाठीच्या भरीव योगदानासाठी भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशीद यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, गोरखभाऊ काळोखे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शहा, निरूपा कानिटकर, सदस्य विलास काळोखे,प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, संदीप काकडे, किरण काकडे आदी उपस्थित होते.

Advertisement

सुमित्रा महाजन म्हणाल्या, की जे तुम्हाला मिळाले आहे, त्यापेक्षा अधिक समाजाला द्यायचे असते, हे आपली ज्ञान परंपरा शिकवते. ‘आम्ही भारताचे लोक’ हे आपली राज्यघटना सांगते. यातही आपली ज्ञान परंपरा आहे. चांगल्या चरित्रामधून चांगल्या ज्ञान परंपरेचा शोध लागतो. चांगले संस्कार हे भारतीय ज्ञान परंपरेत सांगितले आहेत. गुरुकुल पद्धती, वेद हे केवळ धार्मिक गोष्टींशी संबंधित नाहीत, तर त्याचा संबंध ज्ञान परंपरेच्या मुळशी आहे, हे विसरता कामा नये. कुंभ मेला केवळ पूजा अर्चा नाही, तर तो वैचारिक देवाणघेवाणीचा कुंभमेळा आहे. शिक्षण हे आपल्याला चिंतन, मनन करायला शिकवते. वेद वा इतर ग्रंथातून कशाला कशाचे महत्त्व आहे, हे सांगितले आहे. ते आपल्यात झिरपण्याची आवश्यकता आहे. श्रीकृष्ण केवळ रासक्रीडा खेळलेला नाही. त्याचे त्यापुढील कार्य का लक्षात घेत नाही. श्रीकृष्ण चरित्र आपण कधी समजून घेणार आहोत. जे काही शिकत आहात, ते मनापासून शिका.अहिल्याबाई होळकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी देशातील तरुणांना दिशा दाखविण्याचे काम केले. जे आपल्याला मिळते, त्यापेक्षा अधिक द्यायचे आहे, हे भारतीय ज्ञान परंपरा शिकवते.

प्रास्ताविक रामदास काकडे यांनी केले. ते म्हणाले, मागच्या पिढीचे विचार पुढच्या पिढीला देण्याच्या उद्देशाने ही व्याख्यानमाला सुरू करण्यात आली आहे. मावळातील सामाजिक, शैक्षणिक, संप्रदायिक, आरोग्य क्षेत्रात मावळभूषण कृष्णराव भेगडे यांचे भरीव योगदान आहे. त्यांच्या नावाच्या या व्याख्यानमालेची उत्तरोत्तर उंची वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. बाळासाहेब काशीद व अरुणा ढेरे यांनीही विचार व्यक्त करीत पुरस्काराने गौरव केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे व प्रा. दीप्ती कन्हेरीकर यांनी, तर शैलेश शाह यांनी आभार मानले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page