माजी नगरसेवक तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष वसंतराव खांडगे यांचे निधन
- तळेगाव दाभाडे:
तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगरसेवक नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष ह भ प वसंतराव उर्फ दादा लक्ष्मणराव खांडगे यांचे निधन झाले आहे ते 89 वर्षाचे होते.
वसंतराव यांनी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा काही काळ सांभाळली होती.1974 मधील नगरसेवक म्हणून त्यांची कारकीर्द विशेष ठरली. गवत बाजाराचे प्रसिद्ध व्यापारी म्हणून ते प्रसिद्ध होते. अत्यंत प्रामाणिक,शांत, संयमी,मितभाषी आणि अजातशत्रू असे व्यक्तिमत्त्व म्हणून ते सुपरीचीत होते. सामाजिक, शैक्षणिक, सांप्रदायिक, राजकीय क्षेत्रात त्यांचे योगदान राहिले. ते उत्कृष्ट मृदूंग वादक आणि भजनकरी देखील होते. त्यांच्या पश्चात मुलगा, चार मुली,सुना, पुतणे,नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांचे ते वडील तर नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे व उद्योजक स्वानंद खांडगे यांचे ते चुलते होत.






