भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त लोणावळा शहरामध्ये सर्व धर्मीय संविधान रॅली मोठ्या उत्साहात संपन्न
लोणावळा : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त लोणावळा शहरांमध्ये सर्व धर्मीय संविधान रॅलीचे आयोजन 16 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. या रॅलीला सर्व धर्मीय धर्मगुरू सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, अध्यक्ष व सर्व धर्मीय नागरिकांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला. विविध शाळांमधील विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. मावळा पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान रथामधून संविधान प्रतीची मिरवणूक काढण्यात आली होती. कार्यक्रम स्थळी सर्व महापुरुषांचे पुतळे व समूह शिल्पांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सूर्यकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहरामध्ये संविधान गौरव समिती स्थापन करण्यात आली होती. लोणावळा शहरांमधील प्रसिद्ध असे वास्तु विशारद व माजी नगरसेवक दत्तात्रय येवले यांना या संविधान गौरव समितीचे अध्यक्ष पद देण्यात आले होते तर मुस्लिम समाजाचे नेते व माजी नगरसेवक नासिर शेख यांना कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. माजी नगरसेवक देविदास कडू, डॉ. किरण गायकवाड, गणेश गायकवाड, नारायण पाळेकर, दिलीप गुप्ता यांनी उपाध्यक्ष म्हणून तर महेंद्र ओसवाल यांनी खजिनदार म्हणून जबाबदारी सांभाळली. अगदी कमी वेळामध्ये या संविधान गौरव समितीची स्थापना करत प्रत्येकाला कार्यक्रमाची जबाबदारी विभागून देण्यात आली होती. संविधान जनजागृतीसाठी या समितीचे पदाधिकारी व सदस्य यांनी लोणावळा व खंडाळा परिसरातील विविध धर्मीयांच्या भेटी घेत त्यांना या रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच सर्व शाळा व राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांना देखील या रॅलीमध्ये सहभागी होण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. समिती सदस्यांच्या आवाहनाला शहरातील सर्व धर्मीय व सर्व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत या रॅलीमध्ये सहभाग घेत संविधानाचा गौरव केला.
संविधान गौरव समितीच्या वतीने लोणावळा शहरांमधील शासकीय, निमशासकीय कार्यालय तसेच शाळा व विविध संस्था, संघटना यांना 75 संविधानाच्या प्रती वाटप करण्यात आले आहेत. या संविधान गौरव समारंभाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस निखिल कवीश्वर यांनी केले तर सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापक बापूलाल तारे यांनी केले. विविध मान्यवरांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली, उपस्थितांचे आभार संजय गायकवाड यांनी मानले.