लोणावळ्यात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी; पोलिस गस्त कमी झाल्याने चोरट्यांचे फावले
लोणावळा :
लोणावळा शहरातील नांगरगाव परिसरात मंगळवारी रात्री तीन ठिकाणी चोऱ्यांच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साधना रेसिडेन्सी बिल्डिंगमधील राजू खांडेभराड यांच्या बंद फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे लॉक तोडून सुमारे ३० हजार रुपयांची रोकड आणि दीड तोळे सोने चोरून नेले आहे. चोरट्यांनी घरातील इतर साहित्याचीही तोडफोड केली आहे.
याच परिसरातील दत्त सोसायटी मधील श्रीमती कोळकर आणि अनघा कुलकर्णी यांच्या बंगल्यांमध्येही चोरी झाल्याची माहिती मिळाली आहे. तर भालेकर यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.
या तीनही घटनांमध्ये तीन अज्ञात चोरट्यांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरू आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, अलीकडे शहरातील रात्रीची पोलीस गस्त कमी झाल्याने अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वाढत आहेत. काही काळापूर्वी शहर पोलिसांकडून रात्रभर गस्त घातली जात होती, तसेच सोसायट्यांमधील सुरक्षारक्षकांशी समन्वय साधून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात होते. मात्र, सध्या ही गस्त कमी झाल्याने चोरट्यांना मोकळे रान मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.






