“लोणावळा महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाला आंतरराष्ट्रीय स्तरावर यश” ‘एल्सवेअर’च्या प्रतिष्ठित जर्नलमध्ये सलग संशोधन लेख प्रकाशित
लोणावळा:
लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे डॉ. बी. एन. पुरंदरे कला, श्रीमती एस. जी. गुप्ता वाणिज्य व श्रीमती शारदाबेन अमृतलाल मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय, लोणावळा येथील रसायनशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. मल्हारी नागटिळक आणि प्रा. संदीप लबडे यांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. नेदरलँड्स येथून प्रकाशित होणाऱ्या ‘एल्सवेअर’च्या “मटेरियल्स केमिस्ट्री अँड फिजिक्स ” (इम्पॅक्ट फॅक्टर ४.७) या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये त्यांचा संशोधन लेख नुकताच प्रकाशित झाला आहे. गेल्या दोन वर्षांत लोणावळा महाविद्यालयातील संशोधन समूहाने उच्च प्रभावांक असलेल्या आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये सलग संशोधन लेख प्रकाशित करून उल्लेखनीय प्रगती साधली आहे. या यशाच्या मालिकेत आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे.
संशोधन लेखाचे शीर्षक
“Effluent Treatment Using Powdered Silk: Spectroscopic and Molecular Docking Insights into Malachite Green Oxalate Adsorption”
(पावडर सिल्क वापरून सांडपाणी प्रक्रिया: मॅलाकाइट ग्रीन ऑक्सलेट शोषणाचे स्पेक्ट्रोस्कोपिक व मॉलिक्युलर डॉकिंग अंतर्दृष्टी)
या शीर्षकाचा हा संशोधन लेख सांडपाण्यातील घातक रंगद्रव्यांच्या निर्मूलनासाठी शाश्वत व पर्यावरणपूरक उपाय सुचवणारा आहे. या अभ्यासात अत्याधुनिक स्पेक्ट्रोस्कोपिक तंत्रे व मॉलिक्युलर डॉकिंग पद्धती यांच्या साहाय्याने शोषण प्रक्रियेची सूक्ष्म पातळीवरील यंत्रणा स्पष्ट करण्यात आली आहे.
संशोधनाचा मुख्य उद्देश
या अभ्यासात मॅलाकाइट ग्रीन ऑक्सलेट हा अत्यंत विषारी रंग सांडपाण्यातून काढून टाकण्यासाठी ‘पावडर रेशीम’ या जैव-शोषकाचा वापर करण्यात आला.
संशोधनाची पार्श्वभूमी
जलस्रोतांमधील घातक प्रदूषकांचे निर्मूलन हे वाढत्या औद्योगिकीकरण व नागरीकरणामुळे गंभीर पर्यावरणीय व सार्वजनिक आरोग्याचे आव्हान बनले आहे.. वस्त्रोद्योगात मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा मॅलाकाइट ग्रीन ऑक्सलेट (Malachite Green Oxalate – MG) हा रंगद्रव्य कापूस, रेशीम व लोकरीच्या वस्त्रोद्योगात मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. तसेच मत्स्यपालन, पशुवैद्यकीय उपचार व जैविक संशोधनामध्येही त्याचा वापर होतो. मात्र, मॅलाकाइट ग्रीन ऑक्सलेट हा रंगद्रव्य जलपर्यावरणासाठी अत्यंत विषारी आहे. त्यामुळे सांडपाण्यातून या रंगाचे प्रभावी निर्मूलन आवश्यक ठरते. विविध सांडपाणी उपचार पद्धतींपैकी शोषण (Adsorption) ही पद्धत सेंद्रिय व अजैविक प्रदूषकांचे निर्मूलन करण्यासाठी प्रभावी, बहुपयोगी व किफायतशीर मानली जाते. या पद्धतीत विषारी घटक काढून टाकताना दुय्यम हानिकारक पदार्थ निर्माण होत नाहीत तसेच पाण्याच्या गुणवत्तेत लक्षणीय बदल होत नाही, त्यामुळे ती शाश्वत सांडपाणी उपचारासाठी उपयुक्त ठरते. या पार्श्वभूमीवर सदर संशोधनात पावडर स्वरूपातील रेशीम (Powdered Silk) हा कमी खर्चिक, सहज उपलब्ध व पर्यावरणपूरक जैव-शोषक म्हणून वापरता येऊ शकतो का, याचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.
संशोधनातील महत्त्वपूर्ण निष्कर्ष
उच्च कार्यक्षमता: रेशमी पावडरने ९९% पर्यंत रंग काढून टाकला.
शोषण क्षमता: कमाल शोषण क्षमता २३.४१ mg/g आढळली.
अत्यंत वेगवान प्रक्रिया: बहुतेक शोषण अवघ्या ६० सेकंदांत पूर्ण झाले.
सर्वोत्तम pH स्तर: pH ८ (क्षारीय स्थिती) मध्ये प्रक्रिया अधिक प्रभावी.
उष्णताग्राही व स्फूर्त प्रक्रिया: शोषण प्रक्रिया उष्णताग्राही व स्वयंस्फूर्त असल्याचे आढळले.
मॉलिक्युलर डॉकिंग विश्लेषण: रंग व रेशीम यांच्यातील हायड्रोजन बाँडिंगमुळे शोषण प्रभावी होते.
पुनर्वापर क्षमता: pH २ (अम्लीय स्थिती) मध्ये रंग वेगळा करून शोषकाचा पुनर्वापर शक्य.
जरी या शोषकाची क्षमता काही अभियांत्रिकी शोषकांच्या तुलनेत मध्यम असली, तरी उच्च निर्मूलन कार्यक्षमता, जलद गती, सोपी तयारी आणि शाश्वत नैसर्गिक स्रोत यांमुळे पावडर रेशीम सांडपाण्यातील रंगद्रव्यांसाठी कमी खर्चिक ‘पॉलिशिंग मटेरियल’ म्हणून उपयुक्त ठरू शकते. भविष्यात या तंत्रज्ञानाची औद्योगिक स्तरावरील उपयुक्तता, निवडकता, पर्यावरणीय सुरक्षितता व प्रत्यक्ष सांडपाणी उपचार प्रणालींमधील वापर यांचा अभ्यास करण्यात येणार आहे.
निष्कर्ष:
पावडर रेशीम हा मालाकाइट ग्रीन ऑक्सालेटयुक्त सांडपाणी शुद्ध करण्यासाठी एक स्वस्त, पर्यावरणास अनुकूल आणि कार्यक्षम पर्याय आहे
संशोधन मार्गदर्शन व सहभाग
हे संशोधन कार्य प्रोफेसर डॉ. रंजना जाधव व प्रोफेसर डॉ. शकुंतला सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. किरण लाळगे यांच्या संगणकीय सहकार्याने पूर्ण झाले.लोणावळा महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. मल्हारी नागटिळक आणि प्रा. संदीप लबडे यांच्या संशोधन गटाने हे महत्त्वपूर्ण कार्य साकारले.
संस्थेकडून अभिनंदन
लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष श्री. रमेशचंद्र नय्यर, उपाध्यक्ष श्री. दत्तात्रय पाळेकर, सचिव अॅड. नीलिमा खिरे, खजिनदार श्री. दत्तात्रय येवले व सर्व विश्वस्त, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख, उपप्राचार्य डॉ. विलास पाटील, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. संदीप सोनटक्के, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी संशोधकांचे अभिनंदन केले.
प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख म्हणाले,
“एल्सवेअरच्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेले हे संशोधन शाश्वत पर्यावरण संरक्षणासाठी उपयुक्त ठरणारे असून, विद्यार्थी-केंद्रित शिक्षण व गुणवत्तापूर्ण संशोधनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हे यश महाविद्यालयातील संशोधन संस्कृती, आंतरशाखीय सहकार्य आणि शाश्वत विज्ञानावरील दृढ बांधिलकी अधोरेखित करणारे असून, संस्थेची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक ओळख अधिक बळकट करणारे आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल मी डॉ. मल्हारी नागटिळक, प्रा. संदीप लबडे व संपूर्ण संशोधन संघाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”
पुढील दिशा
भविष्यात या तंत्रज्ञानाची औद्योगिक स्तरावरील उपयुक्तता, निवडकता, पर्यावरणीय सुरक्षितता व प्रत्यक्ष सांडपाणी उपचार प्रणालींमधील वापर यांचा अभ्यास करण्यात येणार आहे.






