*स्वयंसेवकांनी सेवाभाव जपत राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे – चंद्रकांत शेटे*
मावळ :
स्वयंसेवक होणे ही विद्यार्थी दशेतील सर्वात महत्त्वाची बाब असते. पूर्ण सेवाभाव अंगीकारून विद्यार्थ्यांनी उद्याच्या महासत्ता होऊ घातलेल्या भारत देशाच्या निर्मितीमध्ये योगदान द्यावे असे मत इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इंद्रायणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ५५ व्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन कल्हाट या गावी शेटे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी कल्हाट गावचे विद्यमान सरपंच शिवाजी करवंदे, देविदास करवंदे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, प्रा.काशिनाथ अडसूळ इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे मार्गदर्शन करताना म्हणाले की, श्रमाचे महत्त्व विद्यार्थी दशेतच समजू शकते. श्रम आणि संस्कार या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाच्या असतात. तसेच त्या विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. विद्यार्थ्यांनी या दोन्ही गोष्टींच्या आधारे जगण्याची शिस्त व महाविद्यालयीन शैक्षणिक कामकाज पूर्ण करत आयुष्याला आकार द्यावा असे डॉ. मलघे म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. दीप्ती पेठे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात प्रा. पेठे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या श्रमसंस्कार शिबिराची माहिती दिली तसेच या माध्यमातून कल्हाट गावच्या झालेल्या विकास कामांचा लेखाजोखा त्यांनी उपस्थितांसमोर मांडला.
सूत्रसंचालन प्रा.डी.पी काकडे यांनी केले तर प्रा. प्रसन्न नेने यांनी आभार मानले. सात दिवसांच्या या विशेष श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना श्रम, स्वयंशिसस्ती बरोबरच युथ फॉर माय भारत अँड युथ फॉर डिजिटल लिटरसी याबाबत मार्गदर्शन लाभणार आहे.