इंदोरी येथे डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्य संकलन अभियान
इंदोरी : डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने इंद्रायणी नदीच्या घाटावर गणेश विसर्जनानंतर निर्माल्य संकलन अभियान राबविण्यात आले. या अभियानाचे मार्गदर्शन तिर्थरूप डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि तिर्थरूप डॉ. श्री. सचिन दादा धर्माधिकारी यांनी केले.
या अभियानात प्रतिष्ठानचे ५० ते ६० सदस्य सहभागी झाले होते. सकाळी ११ वाजेपासून संध्याकाळी ८ वाजेपर्यंत चाललेल्या या उपक्रमात सुमारे एक टन निर्माल्य गोळा करण्यात आले. गोळा केलेल्या निर्माल्यामधून प्लास्टिक आणि न कुजणारे घटक वेगळे करून उर्वरित सेंद्रिय निर्माल्याचे खत तयार केले जाईल. हे खत प्रतिष्ठानमार्फत लागवड केलेल्या वृक्षांना वापरण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे इंद्रायणी नदीतील प्रदूषण रोखण्यास मोठी मदत होणार आहे.
प्रतिष्ठान दरवर्षी अनेक ठिकाणी असे निर्माल्य संकलन अभियान राबवते. याशिवाय वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, जल पुनर्भरण असे विविध समाजोपयोगी उपक्रम प्रतिष्ठान सातत्याने राबवत आहे.






