*हिंदी खऱ्या अर्थाने वैश्विक भाषा- विपिन पवार*
तळेगाव दाभाडे (दि.१९):
हिंदी भाषा ही राजभाषा म्हणून जरी मान्य केली गेली असली तरी खऱ्या अर्थाने ती राष्ट्रभाषा आहे. कारण राष्ट्राची अस्मिता ही राष्ट्रभाषेवरच अवलंबून असते म्हणून हिंदी भारताची राष्ट्रभाषा तर आहेच परंतु खऱ्या अर्थाने समाजाने मान्य केकेली विश्वाची भाषा असल्याचे गौरवोद्गार प्रसिद्ध हिंदी साहित्यिक व रेल्वे निदेशक डॉ. विपिन पवार यांनी काढले. इंद्रायणी महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने ‘हिंदी पखवाडा’ निमित्त आयोजित व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस पी भोसले, हिंदी विभागप्रमुख डॉ. मधुकर देशमुख, प्रा. राजेंद्र आठवले, प्रा. अर्चना पाटील, विविध विषयांचे विभागप्रमुख व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदासजी काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
पुढे बोलताना डॉ. पवार म्हणाले की, हिंदी भाषा रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची भाषा असून केंद्र सरकारच्या आखत्यारीतील सर्व कार्यालये, नॅशनल बँक, पोस्ट ऑफिस तसेच केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये हिंदी भाषिकांसाठी राखीव जागा आहेत. परदेशात अनेक नामांकित विद्यापीठांमध्ये तसेच भारतभर अनेक नामांकित विद्यापीठांमध्ये हिंदी भाषा शिकवले जाते त्यामुळे हिंदी खऱ्या अर्थाने वैश्विक भाषा आहे याचा अभिमान वाटतो.
आपल्या अध्यक्षीय भाषणात कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस पी भोसले म्हणाले की, इंग्रजी हा माझा विषय जरी असला तरी राष्ट्रभाषा म्हणूनही हिंदी भाषेला मी वंदन करतो. हिंदी भाषेची आवश्यकता बाहेर गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी भासते त्यामुळे सर्वच प्रदेशातील लोकांच्या भावना लक्षात घेता हिंदी हे राष्ट्रभाषा ठरते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख डॉ. मधुकर देशमुख यांनी केले. आपल्या प्रास्तविकात त्यांनी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यामुळे हिंदी भाषेचा उपयोग केवळ कार्यालयापुरताच मर्यादित राहिला या वास्तवाकडे लक्ष वेधले. हिंदी भाषेची स्पर्धा इतर कोणत्याही भारतीय भाषेशी नसून राजकीय स्वार्थासाठी आणि राजकीय फायद्यासाठी हिंदी भाषेला इतर भारतीय भाषांशी लढविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे परखड मत यावेळी डॉ. देशमुख यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ हिंदी विभागातील प्रा. राजेंद्र आठवले यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार कनिष्ठ महाविद्यालयातील हिंदी विषयाच्या प्रा. अर्चना पाटील यांनी केले.