उत्पत्ती एकादशी निमित्त देहूत भाविकांची मोठी गर्दी; देवस्थान परिसर फुलांनी सजला
देहूगाव :

अध्यात्मिक जागृती आणि भक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या उत्पत्ती एकादशी निमित्त देहूगावात शनिवारी (ता. १५) भाविकांची मोठी गर्दी उसळली. आळंदीतील कार्तिकी एकादशी यात्रा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवनी समाधी सोहळ्याशी संबंधित असून तब्बल ७२५ वर्षांचा परंपरागत इतिहास या यात्रेला लाभला आहे. चातुर्मासानंतर येणाऱ्या या एकादशीपासून यात्रेचा शुभारंभ होतो. हजारो-लाखो वारकरी या काळात आळंदीत दाखल होऊन माऊलींचे दर्शन घेतात.
याच पार्श्वभूमीवर देहू देवस्थान संस्थानच्या वतीने मुख्य मंदिर महाद्वार, विठ्ठल–रखुमाई मंदिर, श्रीराम मंदिर आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज शिळा मंदिराची रंगीबेरंगी फुले, पाने आणि आकर्षक रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली.शनिवारी पहाटेपासून भाविकांच्या रांगा लागल्या असून, दिवसभर रांगेत उभे राहून वारकऱ्यांनी दर्शन घेतले.
*आळंकापुरीस पांडुरंग गेले।समाधिस्थ केले पांडुरंगा।।उरकोनी सोहळा संगे संत मेळा । विठोबा राहिला आळंदीस।।* साक्षात श्रीपांडुरंगानीच स्वमुखे नामदेवरायांना सांगितले आहे ,की ,,कार्तिकी एकादशी माझी ,तर कृष्ण एकादशी ज्ञानोबांची . आम्ही कार्तिकात या एकादशीला कायम आमच्या लाडक्या ज्ञानोबांच्या समवेत बसू.या एकादशीला पंढरपूरवरून स्वतः पांडुरंग ,तर नामदेव महाराज देखील या समाधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आलंकापुरीत येतात.म्हणून या
उत्पत्ती एकादशीला विशेष अध्यात्मिक महत्त्व आहे. हा दिवस अंधारावर प्रकाशाचा विजय, अध्यात्मिक जागृती आणि श्रद्धेचे नूतनीकरण दर्शवणारा मानला जातो. या निमित्त देहूगावात अनेक ठिकाणी सप्ताह, भजन, कीर्तन, हरिपाठ, प्रवचन आणि टाळ–मृदुंगाचा गजर सुरू असून, ‘ज्ञानोबा माऊली’, ‘तुकाराम’ आणि ‘हरीनाम’ यांनी संपूर्ण देहूनगरी भक्तिमय झाली आहे.
देहूगावात दिवसभर अध्यात्मिक उर्जा, भक्तिभाव आणि वारकरी परंपरेचा उत्साह अनुभवायला मिळाला.






