मोशीत धारदार शस्त्राने एकाचा खून, काही तासातच पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या
पिंपरी चिंचवड:
मोशीतील ग्रँड हॉटेलसमोर पहाटेच्या सुमारास पाच जणांनी मिळून एकाचा कोयत्याने वार करून खून केला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १६) पहाटे तीनच्या सुमारास घडली. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी काही तासांतच पाचही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली बर्गे (रा. चिंबळी) असे खून झालेल्याचे नाव आहे. घटनास्थळी मिळालेल्या मोबाईलमधून मृताची ओळख पटवण्यात आली. याप्रकरणी अशोक म्हाळसकर, रोहन म्हाळसकर, प्रसाद म्हाळसकर, अमोल निळे आणि संकेत जैद (सर्व रा. चिंबळी) या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
उपायुक्त शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे तीनच्या सुमारास एकजण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहीती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यावेळी एका हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाच आरोपींचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपींना जेरबंद केले.
प्राथमिक तपासात या हत्येचे कारण पैशाच्या देवाणघेवाणीतून झाल्याचे समोर येत आहे. मात्र, नेमके कारण अद्याप स्पष्ट नसल्यामुळे पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.