देहूरोड रेल्वे स्टेशन येथे आत्मदहन आंदोलनाचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला
देहूरोड:
रेल्वे प्रवासी संघ देहूरोड यांच्या वतीने देहूरोड रेल्वे स्टेशन येथे कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते धर्मपाल तंतरपाळे यांनी महिलेच्या वेशात येऊन चालत्या रेल्वे समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत धर्मपाल तंतरपाळे यांना ताब्यात घेतले. आणि त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता टळली. परंतु रेल्वे प्रवासी संघाने जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. देहूरोड रेल्वे प्रवासी संघाने मंडल रेल प्रबंधक पुणे यांना आवाहन केले आहे की लवकरात लवकर कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस किंवा पर्यायी रेल्वे गाडी देहूरोड येथे थांबवावी अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल. या संदर्भात बोलताना धर्मपाल तंतरपाळे म्हणाले की सह्याद्री एक्सप्रेस ही गोरगरीब प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची गाडी होती. ही गाडी बंद झाल्यामुळे अनेक प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. देहूरोड रेल्वे प्रवासी संघाने यापूर्वी देखील अनेकदा निवेदने. आंदोलने व चर्चा केल्या परंतु रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने हे तीव्र पाऊल उचलण्यात आले. गेल्या तीन वर्षापासून कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे गाडी देहूरोड रेल्वे स्थानकात थांबत असे आणि पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी गाडी महत्त्वाची होती ती गाडी बंद करण्यात आली आहे. रेल्वे प्रवासी संघाने ही गाडी पुन्हा सुरू करण्याची मागणी वारंवार केली होती. तसेच जर ही गाडी तत्काळ सुरू होऊ शकत नसेल तर पर्यायी दुसऱ्या गाडीला देहूरोड रेल्वे स्थानकात थांबा द्यावा अशी देखील मागणी आहे. मात्र मंडल रेल्वे प्रबंधक पुणे यांच्याकडून केवळ प्रस्ताव पाठवण्याच्या पलीकडे कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे संतप्त झालेल्या रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी आत्मदहन आंदोलनाचा मार्ग अवलंबला. या आंदोलनाच्या वेळी रघु गव्हाळे. भाजप नेते सूर्यकांत सुर्वे. सामाजिक कार्यकर्ते जलाल शेख .अजय बरवारिया. नंदू शेजुळे. सुलतान शेख. सुभाष म्हस्के. अनिल खंडेलवाल. यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.






