चाकण हादरले! ३ वर्षांच्या चिमुकल्यावर अमानुष अत्याचारानंतर निर्घृण खून; आरोपी पुणे स्थानकावर जेरबंद

SHARE NOW

चाकण : औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण परिसरात मानवतेलाच काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या तीन वर्षांच्या निष्पाप बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा चाकूने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असताना पुणे रेल्वे स्थानकावरून चाकण दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे. मृत बालकाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिली.

खालुंब्रे परिसरात वास्तव्यास असलेली पीडित बालकाची आई मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. शुक्रवारी दुपारी तिचा मुलगा अचानक बेपत्ता झाल्यानंतर तिने परिसरात मोठ्या प्रमाणात शोध घेतला. मात्र काहीच मागमूस न लागल्याने अखेर पोलिसांकडे धाव घेतली.

Advertisement

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तपास सुरू करताना एका बंद खोलीबाबत संशय व्यक्त केला. दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर सुटकेसमध्ये बालकाचा मृतदेह आढळून आला. या दृश्याने पोलिसांसह परिसर हादरून गेला.

प्राथमिक तपासात आरोपीने बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून त्यानंतर चाकूने गळा चिरून खून केल्याचे उघड झाले आहे. गुन्ह्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र पोलिसांनी सापळा रचून पुणे रेल्वे स्थानकावरून त्याला ताब्यात घेतले.

आरोपी महिनाभरापूर्वीच मजुरीसाठी चाकणमध्ये दाखल झाला होता. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या अमानुष घटनेमुळे संपूर्ण चाकण परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांकडून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. पुढील तपास चाकण दक्षिण म्हाळुंगे पोलीस करत आहेत.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page