दुर्धर आजाराशी यशस्वी लढा देणारी ‘आशा’ एक योध्दा – सुनिता राजे पवार आशा नेगी यांच्या ब्युटी ऑफ लाईफ पुस्तकाचे प्रकाशन
पिंपरी, पुणे (दि.२३ सप्टेंबर २०२४) – स्थळ निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर सभागृह … रविवारी संध्याकाळची पाचची वेळ … कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर प्रयत्नपूर्वक मात करून पुन्हा सर्वसामान्य माणसांसारखे जीवन जगण्याचा संदेश देणारे ‘ब्युटी ऑफ लाईफ – द डायरी ऑफ कॅन्सर सर्व्हायवर’ या आशा नेगी लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्याचा प्रसंग …. कॅन्सर झाला हे समजले की रूग्ण मुळापासून कोलमडतो … आपल्याच नशीब हे का, असा प्रश्न पडतो … संपूर्ण कुटुंब सैरभैर होते … कॅन्सरवर मात करू शकतो हे मनाला ही शिवत नाही… परंतु आशा याला अपवाद… त्यांची कहाणी ऐकताना उपस्थित निःशब्द होतात… ही सैनिकाप्रमाणे वीरांगनाच भासते… तिला मनोमन कडक सॅल्युट ठोकतात… आणि सकारात्मक दृष्टिकोन, उर्जा घेऊन आपल्या अवतीभवती वावरणाऱ्यांना संकटावर मात करून नवी उमेद देऊ… असा निष्यय करून बाहेर पडतात.
कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर प्रयत्नपूर्वक मात करून पुन्हा सर्वसामान्य माणसांसारखे जीवन जगण्याचा संदेश देणारी आशा नेगी ही एक योध्दा आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मुळातच स्त्रियांमध्ये लढण्याची शक्ती निसर्गाने दिली आहे. त्यांनी लिहिलेले आणि सुप्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी कव्हर पेज केलेले ‘ब्युटी ऑफ लाईफ – द डायरी ऑफ कॅन्सर सर्व्हायवर’ हे पुस्तक समाजाला प्रेरणा देणारे आहे. अशी पुस्तके प्रकाशित झाली पाहिजेत. हे पुस्तक म्हणजे स्त्रीत्वाचा सन्मान आहे, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाहक आणि संस्कृती प्रकाशनच्या प्रकाशक सुनिता राजे पवार यांनी व्यक्त केले.
आशा नेगी यांनी लिहिलेल्या ‘ब्युटी ऑफ लाईफ’ पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (दि.२२) निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे करण्यात आले. यावेळी आमदार अमित गोरखे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. विश्वास मोरे, भारती विद्यापीठाचे प्रा. डॉ. वैभव ढमाल, कॅन्सर तज्ज्ञ रेश्मा पुराणिक, सुप्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर, न्यू ईरा पब्लिकेशनच्या संस्थापिका अमृता तांदळे, शब्दांकन करणाऱ्या संजना मगर, लेखिका आशा नेगी यांचे पती गिरीश हिरेमठ, मुली आरिका आणि आरा आदी उपस्थित होते.
कॅन्सर सारख्या आजाराशी जे लढा देत आहेत. अशा रुग्णांना, त्यांच्या कुटुंबीयांना प्रेरणा, मार्गदर्शन ब्युटी ऑफ लाईफ या पुस्तकातून होते. पुस्तक सर्वांना प्रेरणा देणारे आहे, असे डॉ. विश्वास मोरे यांनी सांगितले.
बदलती जीवनशैली, भेसळयुक्त अन्न, पर्यावरणातील बदल या काही घटकांचा आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे कॅन्सर सारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. लोक आपल्याकडे कसे पाहतात या पेक्षा आपण स्वतःकडे कसे पाहतो, हे महत्त्वाचे आहे. आपण खंबीर असू तर कुठल्याही आजारांवर, संकटावर मात करू शकतो. हे आशा नेगी यांनी समाजाला दाखवून दिले आहे. योग्य आहार, व्यायाम, विश्रांती घेतली तर आपण आजारांपासून दूर राहू शकतो, असे डॉ. रेश्मा पुराणिक यांनी सांगितले.
स्वतः अंध असूनही लुयी ब्रेल यांनी अंधांना वाचता येईल अशा ब्रेल लिपीचा शोध लावला. ब्रेल लिपी अंधांना वरदान ठरली. तसेच आशा नेगी यांचे पुस्तक कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांना नव्हे तर संकटात सापडलेल्या व्यक्तींना नवी दिशा देऊन जगण्याची उमेद, प्रेरणा देईल, असे आमदार अमित गोरखे म्हणाले. प्रास्ताविक न्यू इरा पब्लिकेशनच्या संस्थापिका अमृता तांदळे, सूत्र संचालन अमृता प्रकाश आणि आशा नेगी यांनी आभार मानले.