श्रीमंत महानगरपालिकेची अर्धवट कमान — कार्तिकी यात्रेत ठरणार वाहतूककोंडीचे कारण

SHARE NOW

देहूगाव :

देहू आळंदी मार्गावर, देहूगाव व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सीमेवर उभारण्यात येत असलेली प्रवेशद्वाराची कमान अर्धवट अवस्थेतच थांबली असून, त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. येत्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या कार्तिकी यात्रेदरम्यान लाखो वारकऱ्यांना या अर्धवट कामाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने हे प्रवेशद्वार उभारण्याचे काम सुरू आहे. तळवडे दिशेकडील रस्त्यावर सिमेंटचे खांब उभे करण्यात आले असून, तळवडेहून येणाऱ्या मार्गावर लोखंडी सांगाडा उभारून स्लॅब टाकण्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. या कामामुळे रस्त्याची रुंदी अरुंद झाली असून दररोज वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहेत. वाहनचालक या अडथळ्यामुळे अक्षरशः हैराण झाले आहेत.

 

दरम्यान, कार्तिकी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या काळात आळंदीहून देहूकडे लाखो वारकरी व भक्त पायी तसेच वाहनांतून प्रवास करतात. याच मार्गावर पीएमपीएमएल व एसटी महामंडळाच्या जादा बसेस, तसेच चाकण एमआयडीसी आणि आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची वाहतूकही मोठ्या प्रमाणावर होते. परिणामी तळवडे ते परंडवळ चौक आणि तळवडे ते भैरवनाथ चौक या मार्गांवर वाहनांचा प्रचंड ताण निर्माण होतो.

Advertisement

 

अशा परिस्थितीत अर्धवट उभी असलेली प्रवेशद्वाराची कमान कार्तिकी यात्रेदरम्यान वाहतूक कोंडीचे मोठे कारण ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे हा लोखंडी सांगाडा कार्तिकी एकादशीपूर्वी तातडीने हटवून मार्ग मोकळा करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि वारकरी करत आहेत.

 

गेल्या तीन-चार वर्षांपासून हेच काम अर्धवट सुरू असून, प्रत्येक वेळी यात्रेच्या आधी सांगाडा काढला जातो आणि यात्रा संपल्यावर पुन्हा काम सुरू होते. पण पूर्णत्वास हे काम कधीच जात नाही. यामुळे केवळ नागरिक त्रस्त नसून, महापालिकेचे आर्थिक नुकसानही होत असल्याचा आरोप केला जात आहे.

 

वारंवार होणाऱ्या या अर्धवट कामाच्या खेळामुळे देहूतील कार्तिकी, संत तुकाराम बीज आणि आषाढी पालखी प्रस्थान सोहळ्यांदरम्यान वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण होतो.

 

*स्थानिक नागरिक आणि वारकरी वर्गाचा सवाल असा* “महापालिकेला या यात्रांचे वेळापत्रक माहीत असूनही काम वेळेवर का पूर्ण होत नाही? प्रशासनाकडून एवढे आर्थिक नुकसान का सहन केले जात आहे?”

याबाबत महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून हे काम पूर्ण करावे, अशी सर्वसामान्यांची मागणी होत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page