मिळवलेल्या संपत्तीचा उपभोग घेऊन शांत जीवन जगण्याचा प्रयत्न करा : निवृत्ती महाराज देशमुख आमदार सुनील शेळके यांचा नागरी सन्मान
तळेगाव दाभाडे:
जीवनात आईवडील, संत आणि भगवंत हीच प्रेमाची माणसे राहिली असून, काळाची भीती घालविण्यासाठी देवाचे नामस्मरण करा. मिळवलेल्या संपत्तीचा उपभोग घेऊन शांत जीवन जगण्याचा प्रयत्न सर्वांनी करा. विश्वाची आई ज्ञानेश्वरी ही नेवासा येथे जन्माला आली असून, तिचे नाव घेतले की मायाही मरते, अशी ज्ञानेश्वरी जीवनात वाचा ती आत्मसात करा, असे आवाहन समाजप्रबोधनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी मावळवासियांना केले.
तळेगाव दाभाडे येथे सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने कल्याणराव उर्फ रामचंद्र जाधव यांच्या स्मरणार्थ जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमालेंतर्गत समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. दीड तासाच्या कीर्तनात इंदुरीकर महाराजांनी भाविकांना विविध उदाहरणे देऊन खळखळून हसवले. दरम्यान, संस्थेच्या वतीने आमदार सुनील शेळके यांचा विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजय झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, उद्योजक विलास काळोखे, गणेश ढोरे, डॉ. सत्यजित वाढोकर, डॉ. वर्षा वाढोकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, साहेबराव कारके, संतोष दाभाडे, कृष्णाजी कारके आदी मान्यवर उपस्थित होते.
ह.भ.प. देशमुख महाराज म्हणाले, की या जगात देव आहे आणि साधु संतांशिवाय तो समजत नाही. माणसाचे सगळे दिवस सारखे नसतात. अभ्यासापेक्षा ज्ञान हे श्रेष्ठ असते आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ हे देवाचे ध्यान आहे. तसेच संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. सर्व जग पैशाच्या मागे धावत आहे. अगदी प्रेमही पैसे बघूनच केले जात आहे. पण मुलींनी अशा खोट्या प्रेमाला भूलू नये. अभ्यास करून मोठा नावलौकिक कमवा. सृष्टीचा निर्माता हा देव असून, सांभाळ करणारा आणि संपवणाराही तोच आहे. ईश्वर हा जगाचा मालक आहे, आपण निमित्त मात्र आहोत. सर्व सुखे पायाखाली घेण्याची ताकद माणसात आहे. जास्त देवदेवही करू नका आणि उपवास केल्याने देव प्रसन्न होतो, ही समजूत दूर करा. सध्याच्या जगात मूर्खांना किंमत आणि सज्जनांना त्रास सुरू आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी सहसचिव अतुल पवार, खजिनदार कैलास काळे, सदस्य डॉ. मिलिंद निकम, राजेश बारणे, अमित बांदल, ग्रंथपाल बाळासाहेब घोजगे, तेजस धोत्रे, विश्वास देशपांडे, तानाजी मराठे, संजय चव्हाण, संजय वाडेकर, बाळासाहेब गायकवाड, संकेत खळदे, भूषण गायकवाड, रतनसिंग राजपूत, विलास टकले, प्रतीक बेंडाळे, मंजुश्री बारणे यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन डॉ. मिलिंद निकम, प्रा. अशोक जाधव यांनी, तर आभार राजेश बारणे यांनी मानले.