हाडांची घनता तपासणी शिबिराला तळेगाव दाभाडेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तळेगाव दाभाडे :

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि ग्युफिक फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हाडांची घनता तपासणी शिबिराला तळेगाव दाभाडे परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गेल्या १४ ते १५ वर्षांपासून सातत्याने आयोजित होणाऱ्या या शिबिरात यंदा सकाळी नऊ वाजताच नागरिकांची रांग लागली होती. एकूण १९७ नागरिकांनी या तपासणीचा लाभ घेतला. ग्युफिक फार्मास्युटिकल्स तर्फे सर्वांना चार दिवसांची मोफत औषधे व तेल देण्यात आले, तसेच आहारविषयक सल्ला आणि मार्गदर्शनही करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजनाने झाली. दीप प्रज्वलन माननीय प्रेसिडेंट श्रीशैल मैथे, मेडिकल डायरेक्टर डॉ. वर्षा वाढोकर, सेक्रेटरी प्रसाद मुंगी, व्हाईस प्रेसिडेंट प्रमोद दाभाडे, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. ज्योती मुंडर्गी, फर्स्ट लेडी मीनाक्षी मेंथे, सौ. वैशाली दाभाडे आणि अर्चना चितळे यांच्या हस्ते पार पडले.

डॉ. ज्योती मुंडर्गी यांनी हाडांची घनता तपासणीचे व आयुर्वेदिक औषधाचे महत्त्व स्पष्ट केले. या शिबिराच्या यशासाठी ज्येष्ठ रो. यादवशेठ खळदे यांचे विशेष सहकार्य लाभले. तपासणीचे कार्य डॉ. वर्षा वाढोकर, डॉ. पद्मजा वढाळकर, डॉ. अपूर्वा आणि डॉ. ज्योती मुंडर्गी यांनी केले.
ग्युफिक फार्माचे श्री. शर्मा, नवीन व रूपाली सकपाळ तसेच रोटरी परिवारातील सर्व सदस्यांच्या परिश्रमामुळे हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.






