आरोग्य सेवेतील निःस्वार्थ सेवेबद्दल डॉ. लक्ष्मणराव कार्ले यांचा कर्मवीर पुरस्काराने गौरव
पिंपरी, प्रतिनिधी :
गेल्या तीस वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या आरोग्य सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल तळेगाव दाभाडे येथील डॉ. लक्ष्मणराव कार्ले यांना कर्मवीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
अहमदपूर (जि. लातूर) येथे आयोजित राज्यस्तरीय कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य संमेलनात भाजप नेते दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते डॉ. कार्ले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील. माजी मंत्री बाळासाहेब जाधव, माजी प्राचार्य डॉ. माधवराव गाडेकर, संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक, कवी विलासराव सिगीकर, माजी आमदार रामभाऊ गुडीले, संमेलनाचे आयोजक व कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड. बी. आर. कलवले यांच्यासह साहित्यप्रेमी रसिक उपस्थित होते.
डॉ. लक्ष्मण कार्ले हे गेल्या तीस वर्षांपासून गरीब, गरजू रुग्णांना चांगली आरोग्यसेवा मिळावी, यासाठी कार्य करीत आले आहेत. कोरोना काळात भीतीच्या सावटाखाली असलेल्या गरीब, गरजू रुग्णांच्या घरी जाऊन अल्प दरात औषधोपचार देण्याचे कामही त्यांनी केले आहे. वयाच्या पंचाहत्तरीत त्यांनी फक्त रुग्णसेवा करण्याच्या उद्देशाने खालुंब्रे येथे श्रद्धा हेल्थकेअर दवाखाना सुरू केला, असून त्या माध्यमातून रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून कार्य सुरू आहे.
दरम्यान, वैद्यकीय सेवेत कायमच गरीब गरजूंना औषधोपचार देण्यात पुढाकार घेल्याने 1993 मध्ये झालेल्या किल्लारी भूकंपानंतर उत्कृष्ट काम केल्याबद्दल, तसेच स्वयंसेवी रक्तदात्यांकडून रक्तदान करून घेऊन 5 लाखापेक्षा अधिक बॅग संकलन व वेगवेगळ्या रक्तपेढीला वितरण केले. सामाजिक बांधिलकीतून मागील तीस वर्षांपासून मोफत सर्वरोग निदान, औषधोपचार व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करत असतात. आदी कार्याची दखल घेऊन त्यांना कर्मवीर पुरस्काराने गौरविण्यात आले.