पवन मावळातील मौजे शिळींब गावात ३९५ वा शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा ! शिवज्योत दौड, महाआरती, भव्य मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांसह शिवजयंती साजरी.
पवन मावळ, दि.22(वार्ताहर) – मावळ तालुक्यातील पवन मावळ विभागातील ऐतिहासिक मौजे शिळींब गावात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती बुधवारी (दि.१९) विविध कार्यक्रमांसह मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिळींब गावातील ‘शिवराय फ्रेंड्स सर्कल गावठाण’ या मंडळाच्या वतीने सलग आठव्या वर्षी भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
शिवजयंती दिनी, सर्वप्रथम गावातील सर्व शिवभक्तांनी ऐतिहासिक किल्ले तिकोणा गडावर जात शिवज्योत प्रज्वलित केली व शिवदौड घेत ती ज्योत वाजत-गाजत गावात आणली. गावातील महिला भगिनींनी शिवज्योतीचे पूजन केले व ज्योत मंडपात स्थापित करण्यात आली. यानंतर शिवप्रतिमेचे पूजन करून सामुहिक महाआरती व शिववंदना संपन्न झाली. तदनंतर मंडळाच्या वतीने सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले. यात प्रामुख्याने निबंध स्पर्धा, लिंबू चमचा – संगीत खुर्ची स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, उखाणे स्पर्धा, महिला वर्गासाठी खास ‘खेळ रंगला पैठणीचा – होम मिनिस्टर’ स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा आदी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यावेळी प्रत्येक स्पर्धेतील विजेत्यास मंडळाच्या वतीने खास आकर्षक बक्षीस देण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाल्यानंतर, छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेची सजविलेल्या पालखीतून गावातून ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी काही लहान मुलांनी बाल शिवाजीचे रूप साकारले होते. यामुळे गावात प्रत्यक्ष बालशिवाजी आल्याचा भास होत होता. सोबत तरूण – तरूणींनी पारंपारिक वेशभूषा परिधान करण्यावर भर दिला होता. तर सर्वच वयोगटातील नागरिक पारंपारिक वेशभूषा करून मिरवणूकीत सहभागी झाले होते. भगवा ध्वज हाती घेत, फेर धरत, फुगड घालत पारंपारिक वाद्यांच्या तालावर ही मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
शिवजयंती कार्यक्रमस्थळी, श्री महादेव मंदिर येथे मिरवणूकीची सांगता झाली. तदनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न झाले. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवचरित्रकार, हभप प्रतिभाताई महाराज कोकाटे यांची सुश्राव्य कीर्तनरूपी सेवा पार पडली. यावेळी शिळींबसह संपूर्ण पंचक्रोशीतील भाविक, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे, राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचे दाखले देत हभप प्रतिभाताई यांनी सुंदर प्रबोधन केले. अखेरीस महाप्रसाद वाटपाने शिवजयंती सोहळा २०२५ कार्यक्रमाची सांगता झाली.