‘शाम ए गझल’ ला रसिकांचा उदंड प्रतिसाद….
तळेगाव दाभाडे :

“जितनी उम्मीद थी, उससे कहीं ज़्यादा पाया,
तेरी चौखट पे मैंने हमेशा सुकून का खज़ाना पाया।”
अशाच काहीशा भावना होत्या ‘शाम ए गझल’ हा कार्यक्रम बघून बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांच्या.
दिनांक ३१ मे २०२६ रोजी श्रीरंग कलानिकेतन संचलित, कराओके क्लब प्रस्तुत ‘शाम ए गझल’ या कराओके संचावर गझल गायन प्रस्तुती असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन, श्रीरंग कलानिकेतन सभागृहात करण्यात आले होते. तळेगावच्या सांस्कृतिक क्षेत्रात फक्त गजलांचा असा हा विशेष कार्यक्रम यापूर्वी क्वचितच झाला असेल. कार्यक्रमाची संकल्पना श्री केशव रामायणे यांची होती.
कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून पंडित श्री किरण परळीकर व फ्रेंड्स ऑफ नेचर चे संस्थापक सदस्य श्री रवींद्र धारणे हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व कराओके क्लबचे ज्येष्ठ सदस्य श्री. सुधीर राणे, श्री. विलास रानडे तसेच श्रीरंग कलानिकेतनचे विश्वस्त श्री. विश्वास देशपांडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
श्री राजीव कुमठेकर यांनी सादर केलेल्या, गुलाम अली यांच्या “चुपके चुपके रात दिन” या ‘निकाह’ चित्रपटातील गझलने सुरु झालेल्या या कार्यक्रमाचा समारोप सुध्दा गुलाम अली यांच्याच “हंगामा है क्यु बरपा” प्रसिद्ध गजलने झाला, ही गझल श्री रुपेश झा यांनी सादर केली. कार्यक्रमात एकूण १७ गायक यांनी १६ वेगवेगळ्या गझल सादर केल्यात. श्री मयूर भरड यांनी मराठी, हिंदी व उर्दु भाषेतील ओघवत्या शैलीत केलेल्या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम अधिक सुश्राव्य झाला व प्रमुख पाहुण्यांना देखील गझल गाण्याचा मोह आवरता आला नाही. श्री धारणे यांनी देखील रंगमंचावर येऊन हंगामा है क्यु बरपा या गझलेतील एक शेर सादर केला.
कराओके क्लबच्या अनेक गायकांना गझल हा प्रकार नवीन असून सुद्धा त्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने गझल सादर केल्या यामागे ‘सरावातील सातत्य’ हेच रहस्य असल्याचे कराओके क्लबचे संस्थापक व अध्यक्ष श्री राजीव कुमठेकर यांनी सांगितले.
“गझलांची निवड करण्यापासून तर सराव आणि पुढे रंगमंच सजावट करे पर्यंत, सर्वत्र कराओके सदस्यांनी एकत्रित उत्स्फूर्तपणे काम केले, यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला.” असे मनोगत श्री केशव रामायणे यांनी व्यक्त केले.
मैफलीचं वातावरण तयार व्हावं यासाठी विशिष्ट प्रकारे केलेली रंगमंचाची सजावट ही या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली. ध्वनी यंत्रणा व इतर तांत्रिक बाबी सांभाळण्याची जबाबदारी श्री कौस्तुभ ठोसर यांनी पार पाडली.
तीन महिन्यांपूर्वी गझलांचा कार्यक्रम करायचा असे ठरल्यानंतर ‘अरे बापरे …गझल’ ते ‘अरे वा… गझल’ इथपर्यंतचा हा सर्व प्रवास होता अशा भावना सौ मीरा रामायणे यांनी आभार प्रदर्शन करताना व्यक्त केल्यात. ‘शाम ए गझल’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी सर्व तळेगावकर रसिक प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानलेत.






