विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची : ज्येष्ठ समाजसेवक शांतिलाल मुथ्था प्रा. संपत गर्जे यांच्या शिक्षण सेवापूर्ती कार्यक्रमाला राज्यभरातून शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती.
पिंपरी:
समाजामध्ये आज मूल्यव्यवस्था ढासळत चाललेली असताना ‘बीजेएस’मध्ये दर्जेदार शिक्षण देण्याचा शिक्षकांचा आटोकाट प्रयत्न असतो. मुलांच्या बुद्धीची वाढती क्षमता लक्षात घेता आजच्या शिक्षकांपुढे फार मोठी आव्हाने आहेत.
जनरेशन गॅपमुळे समाजात विविध विदारक घटना घडत असताना विद्यार्थ्यांना घडवण्यात शिक्षकांची भूमिका फार महत्वाची आहे. प्रा. संपतराव गर्जे यांच्यासारख्या मूल्याधिष्ठित शिक्षकांचा यात मोठा वाटा आहे. प्रा. गर्जे शाळेतून निवृत्त झाले आहेत, सामाजिक जीवनातून नाहीत. त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याचा विचार आहे, असे प्रतिपादन बीजेएस संस्थेचे अध्यक्ष शांतिलालजी मुथ्था यांनी केले.
प्रा. संपत गर्जे यांच्या शिक्षण सेवापूर्ती समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून शांतिलालजी मुथ्था बोलत होते. यावेळी भारतीय जैन संघटना प्रबंध समितीचे अध्यक्ष मा. विलासजी राठोड, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. डॉ. सुधाकरराव आव्हाड, ज्येष्ठ उद्योजक मा. आबाशेठ नागरगोजे, प.पू. शिवानंद स्वामी महाराज, ह.भ.प. प्रवीण महाराज शेंडकर, बीजेएसचे प्रकल्प अधिकारी सुरेश साळुंके, प्राचार्य संतोष भंडारी, प्रा. दिलीपकुमार देशमुख, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र कोकणे, पर्यवेक्षक श्री पांडुरंग पवार, गजानन वाढे, माजी विद्यार्थी समिती समन्वयक अशोक पवार, आदी उपस्थित होते. राज्यभरातून शेकडो माजी विद्यार्थ्यांनी आवर्जून या समारंभाला उपस्थिती लावली.
शांतिलाल मुथ्था म्हणाले की, इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे किल्लारी भूकंपानंतर आपण हाती घेतलेल्या कार्यातून कळाले. बीजेएस शाळेतला विद्यार्थी मोठमोठ्या पदांवर जाऊन नावलौकिक मिळवू शकतो, हे शिक्षकांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. चांगले शिक्षक मिळाले, तर विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सोने होते. यातीलच शिक्षक संपतराव गर्जे यांनी खेळीमेळीच्या वातावरणात शिकवत विद्यार्थ्यांना घडवले. विद्यार्थ्यांना उभे करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
शिवानंद स्वामी महाराज यांनी संपत गर्जे यांच्या कार्याचा गौरव करीत ते निवृत्त नाही, तर अध्यात्मिक कार्यासाठी प्रवृत्त झालेले आहेत असे सांगितले. ह.भ.प. प्रवीण महाराज शेंडकर म्हणाले की, प्रा. गर्जे यांनी विद्यार्थ्यांना व आश्रमांना आर्थिक मदत केली आहे. कवी स्वभाव, लेखक असलेले प्रा. गर्जे नेहमी विद्यार्थ्यांबद्दल बोलत असतात.
सुरेश साळुंके म्हणाले की, शिक्षक व समाजसेवक या दोन्ही भूमिका प्रा. गर्जे यांनी उत्तमपणे वठवल्या आहेत. विद्यार्थी हिच त्यांची संपत्ती आहे. आजही त्यांची शिस्तबद्धता दिसून येते. गेल्या तीस वर्षात काम करताना अनेक अडचणी आल्या, पण त्यातून मार्गक्रमण करीत त्यांनी अनेक आदर्श विद्यार्थी घडवले.
माजी विद्यार्थ्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, किल्लारी भूकंपानंतर आम्हाला पुण्यात बीजेएसने आणले. पुण्यात आलो तेव्हा आमची शैक्षणिक पाटी कोरी होती. मात्र प्रा. संपत गर्जे यांच्यासोबत सर्व शिक्षकांनी कठोर परिश्रम घेत मूल्याधिष्टित शिक्षण देऊन समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे काम केले. त्यामुळेच आज आम्ही मोठमोठ्या पदांवर काम करीत आहोत, हीच त्यांची पोचपावती आहे. प्रा. गर्जे यांच्या संस्काराचा राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनात मोठा फायदा असल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले.
या समारंभाचे आयोजन बीजेएस सेवापूर्ती समितीच्या सदस्य निवेदिता धायबर, प्रा. दिलीप सुर्वे, समस्त बीजेएस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, बीजेएस माजी विद्यार्थी संघटना व माजी मुख्याध्यापक स्व. माणिकराव गर्जे प्रतिष्ठान यांनी केले. प्रास्ताविक वैभव सोनवणे यांनी, कवयित्री सीमाताई गांधी यांनी सूत्रसंचालन, तर माजी प्राचार्य दीपक गर्जे यांनी आभार मानले.