वडगाव मावळ न्यायालयात १३ डिसेंबरला लोकअदालतीचे आयोजन; नागरिकांना तडजोडीची सुवर्णसंधी
वडगाव मावळ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वडगाव मावळ न्यायालयात येत्या १३ डिसेंबर २०२५ रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीचे मार्गदर्शन अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. डी. के. अनभुले यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून, स्थानिक पातळीवर याबाबत उत्सुकता दिसून येत आहे.
लोकअदालतीत प्रामुख्याने नागरिकांची प्रलंबित असलेली विविध प्रकारची प्रकरणे परस्पर सामंजस्याने मिटविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मोटार वाहन कायद्यान्वये नुकसानभरपाईची प्रकरणे, कौटुंबिक वाद, विविध बँकांची प्रकरणे, धनादेश न वटल्याची (कलम १३८) प्रकरणे तसेच नगरपालिका व ग्रामपंचायतीची घरपट्टी–पाणीपट्टी वसुली, एमएसईबीची वीजबिल प्रकरणे आणि काही दिवाणी विषयक तडजोडीची प्रकरणे यांचा या लोकन्यायालयात समावेश करण्यात येणार आहे.
न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकालात काढण्यासाठी लोकअदालती हे प्रभावी व्यासपीठ ठरत असल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणात नागरिक या उपक्रमाचा लाभ घेतात. न्यायालयात चालणारी दीर्घकालीन प्रक्रिया टाळून, परस्परांच्या संमतीने तडजोडीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली निघाल्यास वेळ, खर्च आणि मानसिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होतो. याच पार्श्वभूमीवर वडगाव मावळ येथील लोकअदालतीकडे मावळ परिसरातील नागरिकांचेही लक्ष लागले आहे.
लोकअदालतीत आपापली प्रकरणे मिटवू इच्छिणाऱ्या लाभार्थी नागरिकांनी ठरलेल्या दिवशी मोठ्या संख्येने न्यायालयात हजर राहावे, असे आवाहन न्यायालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे. परस्पर सामंजस्याने समाधानकारक तोडगा काढण्यासाठी ही सुवर्णसंधी असून नागरिकांनी तिचा निश्चित लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.






