उत्रोली जवळ दुचाकीवरून विज कोसळून तरूणाचा जागीच मृत्यू
भोर (तालुका प्रतिनिधी)
भोर तालुक्यातील उत्रोली रस्त्यावर परीट मळा परिसरात शुक्रवारी सायंकाळी दुर्दैवी घटना घडली. दुचाकीवरून प्रवास करत असताना अचानक वीज कोसळल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले आहेत.
मृत तरुणाचे नाव शंकर किसन काटेकर (वय २२, रा. वडगाव डाळ, ता. भोर) असे आहे. या घटनेत सागर शांताराम पवार (वय २५, रा. भोर) आणि चंद्रकांत गणपत वाघमारे (वय २६, रा. वडगाव) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच अनिल रवी घोगरेकर (वय १५, रा. वडगाव) हा किरकोळ जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण दुचाकीवरून उत्रोली मार्गे जात असताना परीट मळा परिसरात अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला. याच दरम्यान त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या भीषण घटनेत शंकर काटेकर यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून काटेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शंकर हा कुटुंबाचा मुख्य आधार असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. नायब तहसीलदारांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली तसेच शासनाच्या मदतीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.






