कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त भव्य विज्ञान, तंत्रज्ञान व कला प्रदर्शन, उत्साहात संपन्न

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित, कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज 28 फेब्रुवारी या *राष्ट्रीय विज्ञान दिना* निमित्त शाळेचा सर्व परिसर शिक्षक , विद्यार्थी व पालकांच्या उत्स्फूर्त सहभागाने गजबजुन गेला होता. या प्रदर्शनात एकूण साडेतीनशे विविध प्रकल्प मांडण्यात आले होते व एकूण साडेपाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तरीत्या सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इंद्रायणी महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा. श्री. संदीपजी भोसले , संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. संदीपजी काकडे, संचालिका सौ. गौरी काकडे, उद्योजिका मा.सौ. राजश्रीताई मस्के, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मिस साईलक्ष्मी व शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ. ज्योती सावंत तसेच शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर लगेच सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

Advertisement

 

विज्ञान प्रदर्शनात वर्तमान, भूत , भविष्य यातील मानवाची प्रगती हा विषय घेऊन सर्व शाळा सजवली होती. यानंतर शाळेच्या शिक्षिका सौ. अश्विनी चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सी. व्ही. रमण यांच्या वैज्ञानिक शोधाचा दाखला देऊन विद्यार्थ्यांनीही त्यांचा आदर्श बाळगावा असे सांगितले. उपमुख्याध्यापिका सौ. ज्योती सावंत यांनी देखील विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाच्या शुभेच्छा देऊन पुढील भविष्यात सर्व विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी असे सांगितले. मिस साई लक्ष्मी यांनीही आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. संचालिका सौ गौरी काकडे यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शिस्त, संस्कार व विज्ञान यांच्यामुळेच वैयक्तिक व सामाजिक आणि त्याचबरोबर राष्ट्रीय प्रगती होत असते असे सांगितले. यानंतर शाळेतील सर्व विज्ञान , गणित , कम्प्युटर या शिक्षकांचा छोटीशी भेट देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी अध्यक्षीय भाषणात मा.श्री संदीप जी भोसले यांनी शाळेचा सर्व परिसर पाहून खूप कौतुक केले. आज आपला भारत अनेक क्षेत्रात पुढे जाताना दिसत आहे. या प्रगतीत मोलाचा वाटा हा विज्ञानाचाच आहे. या विज्ञानामुळेच आपली बहुतेक प्रगती वेगाने होत आहे आणि यामध्ये सर्वात मोठा वाटा हा आजच्या तरुणांचा आहे आणि तुम्ही सर्व विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक आहात. त्यासाठी सतत विज्ञानाची कास धरावी असे सांगितले. त्यानंतर लगेच कार्यक्रमात विज्ञान प्रदर्शनाचे, कम्प्युटर प्रदर्शनाचे, आर्ट अँड क्राफ्ट, प्रदर्शनाचे व रोबोटिक प्रदर्शनाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे सर्व उत्कृष्ट असे वैज्ञानिक प्रकल्प पाहून खूपच कौतुक केले आणि त्यांनी पुढील विज्ञान प्रदर्शनात एका ज्येष्ठ वैज्ञानिकाला पाचरण करण्याचे वचन दिले. या विज्ञान प्रदर्शनाला भेटण्यासाठी पालकांचा उत्स्फूर्त असा सहभाग लाभला. प्रत्येक पालकांनी आपला अतिशय चांगला असा अभिप्राय नोंदविला. विद्यार्थ्यांनीही या विविध प्रकल्पाच्या माध्यमातून आजच्या काळात झालेली वैज्ञानिक प्रगती यांचा आढावा घेऊनच प्रकल्पाची सुरुवात व शेवट केला. प्रत्येक पालकांनी विचारलेल्या प्रश्नांची अतिशय स्तुत्य अशी उत्तरे दिली. त्यामुळे त्यांचे सर्वांनीच खूप खूप कौतुक केले. या सर्व कार्यक्रमांमध्ये शाळेतील सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे व पालकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप शाळेच्या शिक्षिका बिमला कार यांनी केले.

एकूणच सर्व कार्यक्रम हा अतिशय उत्साहपूर्ण व यशस्वीरीत्या संपन्न झाला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page