विश्वास, जबाबदारी आणि विकासाची कसोटी; नगरसेवकांनी जनतेच्या अपेक्षांवर उतरावे : आमदार सुनील शेळके नगराध्यक्ष संतोष दाभाडेंसह २८ नगरसेवकांचा पदभार स्वीकार समारंभ उत्साहात
तळेगाव दाभाडे (मावळ) : सतर्क महाराष्ट्र

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांच्यासह एकूण २८ नगरसेवकांनी सोमवारी (२९ डिसेंबर) अधिकृतपणे पदभार स्वीकारला. या निमित्ताने आयोजित सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. नगरपरिषद भवनात झालेल्या या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सत्कार समारंभास आमदार सुनील शेळके, श्रीमंत दाभाडे सरकार घराण्यातील अंजलीराजे दाभाडे, सत्येंद्रराजे दाभाडे, वृषालीराजे दाभाडे, उमाराजे दाभाडे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, मुख्याधिकारी गिरीष दापकेकर, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाचे पदाधिकारी, तसेच माजी नगराध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी आमदार सुनील शेळके यांनी नगरपरिषदेच्या गेल्या नऊ वर्षांतील कारभाराचा, प्रलंबित विकासकामांचा आणि निवडणुकीदरम्यान घडलेल्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देत नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना मार्गदर्शन केले. “नगरसेवकपद हे केवळ प्रतिष्ठेसाठी किंवा मिरविण्यासाठी नसून ती मोठी जबाबदारी आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करा. गावाचं गावपण टिकवून ठेवा. नगरपरिषद इमारत जितकी सुंदर आहे, तितकंच सुंदर शहर घडवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
मुख्याधिकारी आणि प्रशासनानेही कोणतीही हयगय न करता नवे विकास प्रस्ताव तयार करावेत, त्यांचा सातत्याने पाठपुरावा करून कामांना गती द्यावी, अशी अपेक्षा आमदार शेळके यांनी व्यक्त केली. “निधीची कमतरता भासू देणार नाही. मी आणि बाळा भेगडे दोघेही यासाठी कटिबद्ध आहोत. मात्र कामात कुचराई खपवून घेतली जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
आपल्या खास शैलीत बोलताना आमदार शेळके म्हणाले, “तुम्हा सर्वांना मी नगरपरिषदेत रुबाबदार फेटे घालून आणले आहेत. मात्र जर कोणी जनतेच्या विश्वासाला तडा देणारे वर्तन केले, तर तितक्याच ताकदीने पाणउतारा करण्यास मी मागेपुढे पाहणार नाही. नागरिकांच्या अपेक्षा लक्षात ठेवून त्यांच्या प्रश्नांचे निराकरण कसे होईल, यावर सातत्याने काम करत राहा.” नगरसेवक गणेश काकडे यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना त्यांनी दिलखुलास टिप्पणी केली. “वस्ताद यांनी मलाही फेटा बांधला नाही, असे म्हणालेही नाहीत,” असे सांगत त्यांनी गणेश काकडे यांना अडीच वर्षांनी नगराध्यक्षपदाचा फेटा मीच घालीन, असे आश्वासन दिले. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांनी हास्य आणि टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी आपल्या भाषणात सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन जबाबदारीची जाणीव ठेवून काम करण्याचे आश्वासन दिले. “जनतेने दिलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याचा आम्ही सर्वजण प्रामाणिक प्रयत्न करू,” असे त्यांनी सांगितले.
समारंभात माजी नगराध्यक्ष अंजलीराजे दाभाडे व चित्रा जगनाडे, माजी नगरसेवक चंद्रभान खळदे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, गणेश काकडे आणि खासदार श्रीरंग बारणे यांनीही शुभेच्छापर भाषणे केली. मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी नगरपरिषद अधिकारी वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.






