मावळ – नवलाख उंब्रेत इतिहास घडला; राहुल सातकर ठरला मावळ केसरी, महिलांमध्ये अनुष्का दहिभाते तर कुमार केसरीचा मान ओंकार भोतेला
मावळ –

मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेली मावळ केसरी कुस्ती स्पर्धा २०२५–२६ मावळच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली. प्रशांत दादा भागवत युवा मंच आणि मेघाताई भागवत यांच्या विद्यमाने पार पडलेली ही स्पर्धा अत्यंत भव्य, दिमाखदार आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या सौजन्याने झालेल्या या स्पर्धेत तब्बल १२५ नामवंत कुस्तीगिरांनी सहभाग घेतला.
पुरुष गटात पै. राहुल सत्यवान सातकर (कान्हे) याने दमदार कामगिरी करत मावळ केसरी किताबावर आपले नाव कोरले. विजेत्या राहुल सातकरला आयोजकांच्या वतीने बुलेट मोटरसायकल, मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. महिलांच्या गटात पै. अनुष्का शाहिदास दहिभाते (बेडसे) हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत महिला मावळ केसरीचा मान पटकावला. तिला स्कूटर, मानचिन्ह व रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात आली. कुमार गटात पै. ओंकार शामराव भोते (परंदवडी) याने बाजी मारत कुमार केसरीचा किताब जिंकत हिरो होंडा मोटरसायकल मिळवली.

या स्पर्धेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मावळ तालुक्यात प्रथमच महिलांना मावळ केसरी कुस्ती स्पर्धेत विशेष आणि सन्मानाचे स्थान देण्यात आले. मावळ केसरी किताबाच्या मानकरी पैलवानाला स्व. सचिन शेळके यांच्या स्मरणार्थ सुनील शेळके यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा प्रदान करण्यात आली. या वेळी आमदार सुनील शेळके, ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. विजय भाऊ चौधरी, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्रा. विलास सर कथुरे, तालुका अध्यक्ष गणेश शेठ खांडगे आणि महिला अध्यक्ष सुवर्णाताई राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
स्पर्धेदरम्यान पुरस्कार वितरण सोहळ्यात पै. मारुती आण्णा वाघुजी आडकर यांना जीवनगौरव पुरस्कार, पै. चंद्रकांत नाना दाभाडे यांना मावळभूषण पुरस्कार तर पै. भरत दशरथ लिम्हण यांना मावळ कुस्ती महर्षी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हजारो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या स्पर्धेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमास तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील हेही आवर्जून उपस्थित होते. तसेच नवलाख उंब्रे ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभल्याने हा सोहळा अधिक भव्य आणि आकर्षक ठरला. पैलवानांसाठी सुसज्ज बैठक व्यवस्था, कपडे बदलण्याची सोय, स्वच्छ भोजन व्यवस्था, तसेच सर्व स्पर्धकांना ड्रायफ्रूट किटचे वाटप असा अभिनव उपक्रम राबवण्यात आला, ज्याची परिसरात मोठी चर्चा झाली.
कुस्ती म्हणजे केवळ ताकदीचा खेळ नसून शक्ती, शिस्त, संयम आणि स्फूर्ती यांचा अद्वितीय संगम असल्याचे या स्पर्धेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. पारंपरिक खेळांना आधुनिक स्वरूप देत, तरुण पिढीला कुस्तीच्या मैदानाकडे आकर्षित करणारी ही स्पर्धा मावळच्या क्रीडा परंपरेसाठी नवा मानदंड ठरली असून, प्रशांत दादा भागवत युवा मंच आणि मेघाताई भागवत यांच्या आयोजनाने मावळ केसरी पुरस्काराचे महत्त्व अधिक दृढ झाले आहे.






