योगामुळे एकाग्रता व सकारात्मकता वाढते – ज्योती कवडे
देहूगाव :
योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मोठी मदत होते. तसेच विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता व सकारात्मकता वाढीस लागते, असा संदेश योग शिक्षिका तथा सामाजिक कार्यकर्त्या ज्योती कवडे यांनी दिला.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देहूगाव येथील जगद्गुरू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शनिवारी (ता.२१ जून) शालेय विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत झालेल्या पहिल्या सत्रात इयत्ता सहावी ते दहावीतील सुमारे ९०० विद्यार्थी तसेच यूकेजी, एलकेजी व नर्सरीतील ३०० अशा एकूण १३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दुसऱ्या सत्रात सुमारे १५०० विद्यार्थी-विद्यार्थिनी व ९० शिक्षकांनी सहभाग नोंदवला. सर्वांना ज्योती कवडे यांनी योगाचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले.
‘एक पृथ्वी, एक आरोग्य आणि योग सर्वांसाठी’ या यंदाच्या संकल्पनेनुसार कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व ओंकार उच्चाराने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देत ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, भुजंगासन, वज्रासन व मकरासन आदी विविध आसनांचा सराव करून घेण्यात आला. यासोबतच दीर्घ श्वसन व प्राणायामाचाही अभ्यास करण्यात आला.
योगाभ्यासादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. योगामुळे शरीर व मन निरोगी राहते, तसेच सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो, असा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे अध्यक्ष संतोष साकोरे, सचिव दीपाली साकोरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
यावेळी विद्यार्थ्यांनी ‘करू योग, राहू निरोग’, ‘एक पृथ्वी, एक आरोग्य, योग सर्वांसाठी’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत निरोगी जीवनाचा संकल्प केला. कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रेरणादायी वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचा समारोप प्रार्थनेने करण्यात आला.






