आषाढी वारीपूर्वी देहूत प्रशासनाची धावपळ; विभागीय आयुक्तांकडून व्यापक पाहणी

SHARE NOW

देहूगाव :

आगामी आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू येथे प्रशासनाने तयारीला वेग दिला असून गुरुवारी सकाळी सुमारे सव्वा नऊ वाजता पुणे विभागीय आयुक्त शितल तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संयुक्त पाहणी दौरा पार पडला. वारीदरम्यान होणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता वाहतूक, सुरक्षा आणि मूलभूत सुविधांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

पाहणीदरम्यान विभागीय आयुक्त तेली यांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिरात श्री विठ्ठल-रुक्मिणी तसेच संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर कार्यालयात संस्थानच्या वतीने पालखी सोहळा प्रमुख गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे तसेच विश्वस्त उमेश महाराज मोरे व विक्रमसिंह महाराज मोरे यांनी मान्यवरांचा सत्कार केला.

Advertisement

या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, धीरज पाटील, विक्रांत देशमुख, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, तहसीलदार जयराज देशमुख, देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे, देहूरोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांनी मंदिर परिसर, पालखी मार्ग, वाहतूक नियंत्रण व्यवस्था, पार्किंग सुविधा, गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षा उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचीही तपासणी करण्यात आली. संभाव्य अडचणी लक्षात घेऊन संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

आषाढी वारी सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध व सुरळीत पार पडावा यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page