वारकऱ्यांना खड्डेमय पालखी मार्गाचा त्रास; देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डावर नागरिकांचा संताप
देहूगाव :
कार्तिकी यात्रेला अवघे काही दिवस शिल्लक असताना देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत येणाऱ्या पालखी मार्गाची दुरवस्था चव्हाट्यावर आली आहे. देहूरोड कमान ते संरक्षण विभागाची ऑफिसर्स मेस, तसेच डीएमडी हौस ते एक नंबर बंगल्यापर्यंतच्या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वारकरी, भाविक आणि वाहनचालकांच्या सहनशीलतेची कठोर परीक्षा घेतली जात आहे.
रस्त्याच्या कडेला मोठमोठी झाडे असल्याने त्यांच्या सावलीत खड्डे दिसून न येण्याची शक्यता वाढते. यामुळे वाहने खड्ड्यांवर आदळून नुकसान, तर खड्डे चुकवताना वाहने एकमेकांना धडकण्याच्या घटनाही घडत आहेत. परिणामी, वाहतूक कोंडी हा रोजचा कार्यक्रम झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी रोज याच रस्त्यावरून वावरत असतानाही समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. कार्तिकी यात्रा जवळ असताना तरी या मार्गाचे खड्डेमुक्तीकरण अपेक्षित होते. चिंचोलीतील नागरिकांनी बोर्डाकडे लेखी तक्रारही दिली; मात्र त्यालाही “वाटणार्या अक्षदा” लावून फाईल पुढे ढकलल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या मार्गावरून संत तुकाराम महाराज बीज सोहळा, आषाढी पायी वारी, तसेच विविध धार्मिक यात्रांमध्ये हजारो वारकरी पायी मार्गस्थ होतात. सोबत पीएमपीएल, एसटी, खाजगी वाहने आणि रिक्षांचीही मोठी वाहतूक असते. परंतु सद्यस्थितीत या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे वारकऱ्यांसाठी “मरणयातना” ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
सध्या कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर हजारो भाविक देहूकडे जात असताना, कॅन्टोन्मेंट बोर्डाला वारकरी आणि भाविकांचा पूर्ण विसर पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिक, रिक्षाचालक आणि कामगार वर्गाने रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून वारकऱ्यांचा प्रवास सुखकर करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.






