तळेगाव रेल्वे स्टेशन परिसरात पार्क केलेल्या 35 दुचाकींची तोडफोड; पार्किंग स्टँडच्या पंटरांचा प्रताप
तळेगाव दाभाडे :
तळेगाव रेल्वे स्टेशनच्या विकासाचे बांधकाम सुरू असल्याने प्रवाशांच्या दुचाकी वाहनांसाठी पार्किंग स्टँडची बदलण्यात आलेली जागा आणि तेथे वाहने पार्क न केल्याच्या रागातून गुरुवारी (दि.24) पार्किंग ठेकेदाराच्या सांगण्यावरून त्याच्या पंटरांनी 35 दुचाकींची स्पीडोमीटर्स, हेडलाईट्स आणि सीट कव्हर्सची तोडफोड केल्याची घटना घडली असल्याचे पीडित महिला, विद्यार्थी आणि कर्मचारी प्रवाशांनी सांगितले.
हा प्रकार सकाळी 10 नंतर आणि दुपारी तीनच्या सुमारास घडला. रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली. रेल्वे पोलिसांकडे काहींनी धाव घेत घडलेला प्रकार सांगितला; मात्र त्यांनी हद्दीचे कारण देत तक्रार नोंदवून घेण्यास असमर्थता दर्शवली. तळेगाव वाहतूक विभागाच्या पोलिसांकडे याबाबत तक्रार करण्यासाठी काहींनी प्रयत्न केला. मात्र त्याचा अधिक तपशील मिळू शकला नाही.
दरम्यान, यापूर्वीही स्टँड मध्ये पार्किंग न केलेल्या गाड्या फोडण्याचे उद्योग हे पंटर करत असल्याचे संबंधितांनी सांगितले.