तळेगावात पदपथच नाहीसे विकासाच्या नावाखाली नागरिकांची सुरक्षितता धोक्यात
तळेगाव दाभाडे:
शहराच्या विकासाचा डंका वाजवत असताना तळेगाव प्रशासनाने नागरिकांच्या पायाखालची वाटच संपवली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील पदपथ गायब झाले आहेत आणि त्यामुळे पादचारी आता जीव मुठीत धरून मुख्य रस्त्यावरून चालण्यास मजबूर झाले आहेत. हा प्रकार केवळ निष्काळजीपणाच नाही, तर “विकास” या शब्दाची उघडीपणे थट्टा आहे.
पूर्वी व्यवस्थित, सुस्थितीत आणि सुरक्षित पदपथ हे जेष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, विद्यार्थी, रुग्ण अशा सर्वांसाठी दिलासा ठरले होते. मात्र, रस्त्यांचे रुंदीकरण या कारणाखाली प्रशासनाने हे पदपथ एकेक करून उखडून टाकले. परिणामी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आज ऐरणीवर आला आहे. दिवसा वाहनांची कोंडी, रात्री धावणारी वेगवान दुचाकी आणि चारचाकी यामध्ये पादचारी कोठे उभे राहणार?
“हे कोणाच्या विकासासाठी? असा सवाल आता नागरिक सरळसरळ प्रशासनाला विचारत आहेत. शहराच्या विकासाच्या आराखड्यात पादचाऱ्यांची गरज गृहित धरण्यात आलीच नाही का? वृद्ध नागरिकांना, शाळकरी मुलांना किंवा दिव्यांगांना वाहनांच्या मधोमध चालणे भाग पडत असेल, तर हा विकास नव्हे अविकास आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाला “जनतेच्या पैशाचा अपव्यय आणि जनहिताचा अपमान” असे ठपके दिले आहेत. पदपथ हटविण्याचा निर्णय घेताना ना नागरिकांचा सल्ला, ना सार्वजनिक चर्चा. पारदर्शकतेचा पूर्ण अभाव आणि जबाबदारीची जाणीवही नाही, अशी सर्वसाधारण भावना शहरभर पसरली आहे.
दरम्यान, इतर शहरांत स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पदपथ, सायकल ट्रॅक, हरित पट्टे उभारले जात आहेत. पण तळेगावमध्ये उलट दिशेने चाललेली ही पावले शहर नियोजनातील दूरदृष्टीच्या अभावाकडे बोट दाखवतात. शहराचे सौंदर्य वाढवण्याच्या नावाखाली जर नागरिकांच्या सुरक्षिततेचा बळी द्यायचा असेल, तर तो विकास नव्हे, तर अंधाधुंद बांधकामांचा अंधारा खेळ आहे.
तळेगाव दाभाडे हे पुणे-मुंबई मार्गावरील झपाट्याने वाढणारे शहर आहे. नव्या गृहप्रकल्पांमुळे लोकसंख्या आणि वाहतूक झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी पदपथ ही केवळ सुविधा नाही, तर जीवनरक्षक गरज आहे. प्रशासनाने हे लक्षात न घेणे ही गंभीर चूक आहे.
सध्या नागरिकांकडून “पदपथ तातडीने पुनर्बांधणी करावेत” अशी मागणी जोर धरत आहे. स्थानिक प्रतिनिधींनी या निर्णयामागील हेतू तपासावा आणि जबाबदाऱ्यांचे निर्धारण करावे, अशी मागणीही होत आहे. सोशल मीडियावर नागरिक एकाच सुरात म्हणत आहेत
“विकासाच्या नावाखाली आमचं चालणं थांबवू नका.






