शिक्षक हा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून योग्य दिशा दाखवणारा मुख्य स्रोत आहे – संतोष खांडगे
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे सचिव संतोष खांडगे म्हणाले, “शिक्षक हा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना योग्य दिशा दाखवणारा मुख्य स्रोत असतो. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, प्रेरणा देतात आणि त्यांच्या मनात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करतात. त्यामुळे शिक्षकांचे योगदान अमूल्य आहे. संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान करून आदर व्यक्त केला जातो.”
कार्यक्रमासाठी संस्थेचे ज्येष्ठ संचालक सोनबा गोपाळे, दामोदर शिंदे, महेशभाई शहा, रोटरी क्लबचे उपप्रांतपाल विन्सेंट सालेर, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष प्रविण भोसले, सचिव संदीप मगर, उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, आंतोष मालपोटे, उमा पवार, सुषमा गराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी संस्थेतील सर्व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी गोपाळे गुरुजी म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे स्थान सर्वात वरचे आहे. एक चांगला शिक्षक केवळ अभ्यासच नाही तर प्रामाणिकपणा, परिश्रम, शिस्त आणि सहनशीलता यांसारख्या जीवनमूल्यांची शिकवण देतो.”
संस्थेचे संचालक महेशभाई शहा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भारत काळे यांनी केले.






