संतोष भेगडे यांचा आरोप: गुन्हे दाखल करण्याची मागणी मावळच्या आमदार समर्थकांकडून समाजमाध्यमांवर बदनामी
तळेगाव दाभाडे :
पुणे महानगर विकासप्राधिकरणाचे सदस्य आणि तळेगाव दाभाडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष छबुराव भेगडे यांची समाजमाध्यमावर फोटोत छेडछाड करून बदनामी केली आहे. याबाबत भेगडे यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यात नारायण मालपोटे, अतुल मराठे, किशोर सावंत, अक्षय धामणकर, भरत येवले, प्रशांत अशोकराव जांभळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भेगडे यांनी पोलिस निरीक्षकांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, काही व्यक्तीकडून समाजमाध्यमांवर बदनामी केली आहे. ही बाब कळल्यावर फेसबुक पाहिले असता बदनामी करण्याच्या हेतूने माझ्या फोटोत छेडछाड केली आहे. माझी सामाजिक बदनामी करण्याच्या हेतूने व व्यवसायात अडचणी निर्माण होण्याकरिता समाज माध्यमांतून माझी बदनामी केली. तसेच माझ्या फोटोची छेडछाड करून “होय मी मलिदा गँगचा सभासद” असा बदनामीकारक मजकूर समाज माध्यमांवर काही लोकांनी जाणीवपूर्वक टाकला आहे. यामागे बदनाम करून माझे सामाजिक, राजकीय व आर्थिक नुकसान करण्याचा हेतू स्पष्ट होत आहे. मावळच्या आमदार समर्थकांकडून बदनामी केली जात आहे. षडयंत्रात सहभागी असणाऱ्यांवर क्राईम कायद्यांतर्गत समाज माध्यमांवर बदनामीकारक मजकूर छापल्याबाबत गुन्हा दाखल करावा.