रोटरी क्लब तळेगाव एम.आय.डी.सी. — डी.जी. संतोष मराठे यांनी कार्याचे केले कौतुक
तळेगाव दाभाडे :

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी. ची अधिकृत डी.जी. व्हिजिट दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी अत्यंत उत्साहात आणि औत्सुक्यपूर्ण वातावरणात पार पडली.
या प्रसंगी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर (डी.जी.) रो. संतोष मराठे, फर्स्ट लेडी रो. तनुजा मराठे, असिस्टंट गव्हर्नर (ए.जी.) रो. अशोक शिंदे, तसेच फाउंडेशन डायरेक्टर रो. राजेश राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सायं. ५.३० वाजता डी.जी. यांच्या आगमनाने झाली. प्रारंभी डायस कमिटी व स्ट्रॅटेजिक कमिटी बरोबर बैठक पार पडली. अल्पोपहारानंतर बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक घेण्यात आली. या बैठकीत फाउंडेशन, मेंबरशिप, पब्लिक इमेज आणि सर्विस प्रोजेक्ट्स या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीत रो. दीपक बागल (फाउंडेशन), माजी अध्यक्ष रो. अजय पाटील (मेंबरशिप), रो. योगेश शिंदे (पब्लिक इमेज), रो. युवराज पोटे (सर्विस प्रोजेक्ट्स) व सचिव रो. संदीप मगर यांनी सर्व विविध उपक्रमांची माहिती सादर केली.
संध्याकाळी ७ वाजता दीपप्रज्वलनाने जनरल मीटिंगची सुरुवात झाली. सूत्रसंचालन रो. लक्ष्मण मखर यांनी केले. अध्यक्ष रो. प्रवीण भोसले यांनी प्रास्ताविकात सांगितले की, १ जुलैपासून केवळ चार महिन्यांत क्लबने २७ सामाजिक प्रकल्प राबविले आहेत.
डी.जी. रो. संतोष मराठे यांनी क्लबच्या कार्याचे मनापासून कौतुक करत शब्दरूपी “शंभर मार्क्स देत” गौरवोद्गार काढले, तर ए.जी. रो. अशोक शिंदे यांनी “ग्रेट वर्क अँड क्लब बिल्डिंग” असे म्हणत क्लबच्या टीमस्पिरिटचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ‘सर्विस एक्सलन्स रोटरी अवॉर्ड’ प्रदान समारंभ. या वर्षीचा सन्मान रामदास वाडेकर यांना डी.जी. रो. मराठे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, रोप, ‘तळेगाव इतिहास’ पुस्तक व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव झाला.
त्यांचा परिचय रो. लक्ष्मण मखर यांनी करून दिला, तर संस्थापक अध्यक्ष रो. संतोषजी खांडगे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. वाडेकर यांनी पत्रकारितेद्वारे मावळ तालुक्यातील सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवून न्याय मिळवून देणे तसेच १५ गावांतील मुलींसाठी “सायकल बँक” सुरू करून शिक्षणासाठी वाहतूक सुलभ करणे, या कार्याची विशेष दखल घेण्यात आली.
तसेच संस्थापक अध्यक्ष रो. संतोषजी खांडगे यांचा देखील सन्मान करण्यात आला. नुकतीच त्यांची नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ या ऐतिहासिक संस्थेचे तिसऱ्यांदा सचिवपदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरव झाला.
यानंतर डी.जी. रिपोर्टचे अनावरण डी.जी. रो. मराठे यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या मनोगतात क्लबच्या एकात्मतेचे व सेवाभावाचे कौतुक करत सामाजिक प्रकल्पांना अधिक गती देण्याचे आवाहन केले.
ए.जी. रो. अशोक शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.
रोटल बुलेटिनचे प्रकाशन डी.जी. यांच्या हस्ते पार पडले. बुलेटिन संपादक रो. सुमती निलवे व सहसंपादक रो. गौरी पाटील यांनी बुलेटिन सादर केले.
माजी अध्यक्ष विन्सेंट सालेर यांनी फाउंडेशनला 25 हजार रुपयांचा धनादेश फाउंडेशन डायरेक्टर रो.राजेश राऊत व डीजी रो. संतोष मराठे यांच्याकडे सुपूर्द केला.
रो. बाळासाहेब शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाची सचिव घोषणा रो. संदीप मगर यांनी केली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सदस्य आणि पाहुण्यांनी रुचकर भोजनाचा आस्वाद घेत या संस्मरणीय संध्याकाळी आनंदात समारोप झाला.






