पिंपळे गुरवमधील श्रीनिवास वेस्टसाइड काऊंटी सोसायटीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते उद्घाटन सौरऊर्जा प्रकल्पामुळे सोसायटीच्या वीजबिल खर्चामध्ये होणार मोठी बचत

पिंपरी :

पिंपळे गुरव येथील श्रीनिवास वेस्टसाईड काउंटी गृहरचना संस्थेत स्व-वर्गणीतून उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

यावेळी सोसायटीचे चेअरमन नवनाथ कापरे, सचिव सुजीत सावंत, खजिनदार सुनील घाडगे, संचालक सुनील इंगळे, माजी नगरसेवक सागर आंघोळकर, सामाजिक कार्यकर्ते, राहुल जवळकर, महावितरणचे सांगवी विभागाचे अधिकारी सुरेश गवारे यांच्यासह सोसायटीचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, शंकर जगताप यांचा चिंचवड विधानसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल सोसायटीच्यावतीने सत्कार करण्यात आला.

सोसायटीच्या सभासदांनी स्व-वर्गणीतून उभारलेल्या या प्रकल्पाचे आमदार शंकर जगताप यांनी कौतुक केले. आमदार जगताप म्हणाले, की महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक म्हणजे सौर ऊर्जा प्रणाली. या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे सोसायटीच्या वीज खर्चात मोठी बचत होण्याची अपेक्षा आहे. देखभाल शुल्काव्यतिरिक्त या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला खर्च सभासदांनी स्वतः वर्गणीतून उभारला, हे स्तुत्य आहे. सभासदांची एकी सोसायटीच्या विकासासाठी आवश्यक असते, ही एकी या सोसायटीत पाहायला मिळते. पर्यावरण आणि ऊर्जा संवर्धनासाठी केलेले प्रयत्न कौतुकास पात्र आहेत. आपल्या विभागातील प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आश्वासनही आमदार जगताप यांनी यावेळी दिले.

Advertisement

संस्थेचे सचिव सुजीत सावंत यांनी सौरऊर्जा प्रकल्पासंबंधी माहिती दिली. ४२१ सदनिका असलेल्या या सोसायटीतील नऊ इमारतींच्या टेरेसवर १२२ किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प सोसायटीतील सर्व सभासदांच्या सहकार्याने आणि स्व-वर्गणीतून उभा केला गेला. सध्याची कमिटी दीड वर्षांपूर्वी उदयास आल्यानंतर सोसायटीचा खर्च कमी करण्यासाठी त्यांनी सौर प्रकल्प योजना सर्व सभासदांपुढे मांडली आणि सर्व सभासदांनी त्याला पाठिंबा दिला. संचालक मंडळ आणि सभासद मिळून एक अंतर्गत सौर ऊर्जा समिती स्थापन करण्यात आली. या समितीने या प्रकल्पावर वर्षभर काम केले आणि सहकारातील सर्व बाबींचा विचार करून आराखडा तयार करण्यात आला. विशेष सर्वसाधारण सभा बोलावून प्रकल्पाच्या खर्चासाठी सभासदांची मान्यता घेतली. या प्रकल्पाला एकूण ७० ते ७२ लाख रुपये इतका खर्च आला. हा सर्व खर्च सर्व सभासदांच्या स्व-वर्गणीतून करण्यात आला. या प्रकल्पामुळे सोसायटीच्या वीजबिल खर्चामध्ये साधारणपणे ७० ते ७५ टक्के इतकी कपात होणार आहे.

या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संस्थेचे सभासद अजय घोलप, विजय कारंडे, विजयकुमार पल्लेवार, जयंत बर्वे, सुशील येवले, मंदार आंबीकर, अध्यक्ष नवनाथ कापरे, खजिनदार सुनील घाडगे, सचिव सुजित सावंत, सुनील इंगळे, ज्ञानेश्वर यादव आणि इतर सर्व संचालक मंडळाने विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page