पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश#
पिंपरी चिंचवड :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची खोटी माहिती असलेला एक व्हिडीओ सोशल व्हायरल होत आहे. त्याबाबत पिंपरी-चिंचवड भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केली असता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पिंपरी-चिंचवड पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची चुकीची माहिती देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. हा व्हिडीओ akshit meena९९७ या फेसबुक अकाउंट वरून व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. अहमदाबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये सांगण्यात आले आहे.पिंपरी-चिंचवड भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांच्या निदर्शनास तो व्हिडीओ आला. पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह व्हिडीओ असल्याने भाजप कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. काळभोर यांनी याबाबत मुख्यमंत्री कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी काळभोर यांनी केली.तक्रारीची जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेचे तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.