संविधान मूल्यांचा जागर, तळेगाव दाभाडे नगरपरिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक २ मध्ये उत्साहात संविधान दिन साजरा
तळेगाव दाभाडे — राष्ट्रीय अभिमान आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यासाठी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी नगर परिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक २ मध्ये संविधान दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेच्या परिसरात सकाळपासूनच विद्यार्थ्यांचा उत्साह, देशभक्तीचे सूर आणि जागरूकतेची भावना अनुभवायला मिळाली.
कार्यक्रमाची सुरुवात सहशिक्षिका योगिता तावरे मॅडम यांनी भारतीय संविधान दिन साजरा करण्यामागील उद्देश विद्यार्थ्यांना समजावून सांगत केली. त्यांनी संविधान निर्मितीची प्रक्रिया, त्यातील मूलभूत तत्त्वे आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांबद्दल विद्यार्थ्यांना प्रेरणादायी माहिती दिली. त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला औपचारिक सुरुवात करण्यात आली.
यानंतर प्रमुख मार्गदर्शनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वर्षा थोरात मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी भारतीय संविधानाचा इतिहास, त्याचे महत्त्व, तसेच संविधानाने नागरिकांना दिलेल्या अधिकारांचे आणि कर्तव्यांचे थोडक्यात पण प्रभावी विवेचन केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनानंतर सर्व विद्यार्थ्यांकडून संविधानाची शपथ घेतली गेली. शपथवाचनादरम्यान सभागृहात देशभक्तीचा उत्कट भाव जाणवत होता.
संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या सहभागातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मानवी साखळी, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, प्रभात फेरी, “सेल्फी विथ संविधान”, संविधान शपथ तसेच पथनाट्य अशा विविध उपक्रमांमुळे कार्यक्रम अधिक आकर्षक बनला. “भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य” या विषयावर सादर केलेल्या पथनाट्याने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी आविष्कृत केलेल्या संवाद, कविता आणि भूमिका साकारण्यामुळे डॉ. आंबेडकरांचे योगदान प्रभावीपणे अधोरेखित झाले.
या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल अभिमान, कर्तव्यबुद्धी आणि जागरूकता निर्माण झाली. लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यासाठी संविधान दिनाचे असे उपक्रम अनमोल ठरतात, असा सूर सर्वांनी व्यक्त केला. विद्यालयाने आयोजित केलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनावर कायमस्वरूपी संवैधानिक संस्कार रुजवणारा ठरला.






