बैलपोळा सणानिमित्त शेतकरी सन्मान सोहळा,स्व पैलवान केशवराव ढोरे यांच्या स्मरणार्थ जय बजरंग तालीम ट्रस्टचा उपक्रम
वडगाव मावळ:
बैलपोळा हा सण म्हणजे ग्रामीण संस्कृतीचा आत्मा. शेतकऱ्यांच्या घामाशी परिश्रमाशी आणि मातीतल्या नात्याशी घट्ट जोडलेला हा सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या पावन परंपरेच्या निमित्ताने वडगाव मावळ चावडी चौक येथील जय बजरंग तालीम ट्रस्टच्या वतीने स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे यांच्या स्मरणार्थ भव्य शेतकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वर्गीय केशवराव ढोरे हे वडगाव चे प्रमुख कारभारी. उत्तम कुस्तीगीर तसेच समाज हितासाठी झटणारे कार्यकर्ते म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. शेतकऱ्यांन प्रति त्यांना असलेले आत्मीयप्रेम आणि लोकाभिमुख दृष्टी लक्षात घेऊन त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा सन्मान सोहळा आयोजित केला जातो.
या सोहळ्यात वडगाव व परिसरातील अनेक शेतकरी बांधवांचा शेतातील योगदान. बैलाची जपवणूक आणि पारंपारिक कृषी संस्कृती जिवंत ठेवण्याच्या कार्याबद्दल शेतकरी बांधवांचा सन्मान करण्यात येणार आहे. शेतकरी हा समाजाचा कणा आहे या जाणिवेतून त्यांचा गौरव करणे हे समाजाचे काम आहे.
सणाच्या पारंपारिक उत्साहाला अनुसरून वडगाव मध्ये ढोल ताशाच्या गजरात. बैलाची सजावट. फुलांच्या तोरणांनी गावाची शोभा तसेच बैलांना पुरणपोळी नैवेद्य आणि गोडधोडाचा मान देऊन हा सोहळा रंगणार आहे. या उपक्रमातून बैल आणि शेतकरी या नात्याची कृतज्ञतेने आठवण होणार आहे.
या सन्मान सोहळ्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आत्मविश्वास वाढणार असून त्यांच्या कष्टाचे समाजमान्य रूप दिसून येणार असून शेतकरी हा राष्ट्राचा पोशिंदा आहे ही जाणीव ठळकपणे समोर आणणारा हा उपक्रम ठरणार आहे.
जय बजरंग तालीम ट्रस्ट आणि सर्व वडगावकर ग्रामस्थांनी घेतलेला हा पुढाकार निश्चितच प्रेरणादायी आहे. अशा समाजभिमुख कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात नव्या उत्साहाचा संचार होतो. तसेच स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे यांच्या स्मृती आणि विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवून समाजाला प्रेरणा देतात.






