फार्मासिस्ट नसल्यास मेडिकल स्टोअर्सवर सीलची कारवाई; FDAचा औषध विक्रेत्यांना इशारा

SHARE NOW

मुंबई : राज्यातील औषध विक्री व्यवस्थेत शिस्त आणि पारदर्शकता आणण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर भूमिका घेतली असून, फार्मासिस्ट अनुपस्थित आढळल्यास संबंधित मेडिकल स्टोअर थेट सील करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या औषध विक्रेत्यांविरोधात झिरो टॉलरन्स धोरण राबविण्यात येणार असल्याची माहिती FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

 

औषध विक्री केंद्रांवर पात्र फार्मासिस्ट उपस्थित असणे बंधनकारक असतानाही अनेक ठिकाणी नियमांची पायमल्ली होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. याशिवाय डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री, नोंदींचा अभाव आणि परवान्याच्या अटींचे उल्लंघन अशा प्रकारांवर आता थेट कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

Advertisement

 

मुंढे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. नियमभंग सिद्ध झाल्यास परवाना रद्द करण्यासह फौजदारी कारवाईचाही विचार केला जाईल.त्यामुळे राज्यभरातील औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

FDAने विशेष तपासणी मोहीम सुरू केली असून शेकडो मेडिकल स्टोअर्सची पडताळणी केली जात आहे. तपासणीदरम्यान फार्मासिस्टची उपस्थिती, औषध साठ्याची नोंद, प्रिस्क्रिप्शनवर होणारी विक्री आणि परवान्याच्या अटींचे पालन यांची बारकाईने छाननी केली जात आहे.

 

आरोग्य व्यवस्थेतील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी औषध विक्री व्यवसायाने नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने अधोरेखित केले आहे. आगामी काळात अशा तपासण्या अधिक तीव्र करण्यात येणार असून नियम मोडणाऱ्या मेडिकल स्टोअर्सवर तातडीने दंडात्मक कारवाई होणार असल्याचा स्पष्ट इशारा FDAने दिला आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page