मराठी तरुणांना उद्योग व्यवसायासाठी आवश्यक ती मदत करणार : अर्जुन खामकर मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्या वतीने आयोजित शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी, प्रतिनिधी :
मराठी तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायात करिअर करावे, यासाठी लागणारी सर्व मदत मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्या माध्यमातून केली जाईल, या संधीचा लाभ मराठा समाजातील नवउद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन खामकर यांनी केले.
मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्या वतीने आगामी राज्यस्तरीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे द गजेबो हॉटेल वाकड येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, मराठा सेवा संघाचे जेष्ठ मार्गदर्शक अर्जुनराव तनपुरे, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सिंग पाटील, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संजय वायाळ, संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे, मराठा सेवा संघाचे राज्याचे अध्यक्ष विजय घोगरे, जिल्हाध्यक्ष अर्जुन खामकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरामध्ये विविध उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व मार्गदर्शकांनी आपले अनुभव, संकल्पना व व्यावसायिक धोरणे मांडली. नवउद्योजकांना योग्य दिशा देणे व उद्योग विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. विजय घोगरे यांनी या शिबिरातून नवीन कल्पना, धोरणे व नेटवर्किंग यामुळे तरुण उद्योजक घडतील आणि त्यांच्या व्यवसायवाढीस मदत होईल, असे सांगितले. गंगाधर बनबरे म्हणाले, मराठा समाज कृषिप्रधान असला, तरी नव्या पिढीत उद्योगशीलता वाढावी, उद्योगाच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळावा, ही भूमिका आहे. राजेंद्र सिंग पाटील यांनी सांगितले, युवकांना व्यवसायात यश मिळवण्यासाठी दिशा व मार्गदर्शन महत्त्वाचे असते. हे शिबिर त्याच दिशेने सकारात्मक टप्पा ठरेल.
कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये उपाध्यक्ष बाळासाहेब कोबल, कोषाध्यक्ष बालाजी चव्हाण, महेश आंबाड, मुकेश पाटील, रमेश पवार, स्वाती गोर्डे, स्मिता माने, स्वप्नील वाटाने यांनी परिश्रम घेतले. आभार रोहित जगताप यांनी मानले.