मलेशिया शैक्षणिक दौऱ्यातून नूतन अभियांत्रिकीचे जागतिक सहकार्य अधिक बळकट
पुणे: नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळेगाव दाभाडे, पुणे यांनी नुकताच केलेल्या पाच दिवसीय मलेशिया शैक्षणिक दौऱ्याद्वारे आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि उच्च शिक्षणाच्या जागतिकीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
नूतन अभियांत्रिकीचे संचालक डॉ. प्रमोद पाटील, संशोधन व विकास अधिष्ठाता डॉ. विलास देवतारे, तसेच शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. सागर शिंदे यांच्या प्रतिनिधीमंडळाने सनवे विद्यापीठ, एशिया पॅसिफिक विद्यापीठ आणि लिंकन विद्यापीठ येथे भेट देत शैक्षणिक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन उपक्रम, विद्यार्थी-प्राध्यापक विनिमय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या विविध शक्यतांवर सविस्तर चर्चा केली. डॉ. सागर शिंदे यांच्या सततच्या संपर्क आणि नियमित पाठपुराव्यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यापीठासोबत करार करण्यास मदत झाली
या दौऱ्यात नूतन अभियांत्रिकी च्या वतीने एशिया पॅसिफिक विद्यापीठ आणि लिंकन विद्यापीठ महाविद्यालय यांच्याशी दोन सामंजस्य करार करण्यात आले. एशिया पॅसिफिक विद्यापीठ येथे झालेला करार कार्यक्रम तेथील कुलगुरू व उपकुलगुरू यांच्या उपस्थितीत पार पडला. या करारांमुळे दीर्घकालीन शैक्षणिक सहकार्य, अभ्यासक्रम विकास, संयुक्त संशोधन, तसेच विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण-संधी अधिक दृढ होतील.
लिंकन विद्यापीठातील बैठकीत संशोधनप्रकाशन, प्राध्यापक देवाणघेवाण, विद्यार्थी आदानप्रदान, आणि नवोन्मेषक प्रकल्पांवर संयुक्त उपक्रम राबविण्यावर विशेष भर देण्यात आला.
या दौऱ्यात आयोजित चर्चासत्रात नूतन अभियांत्रिकीचे संचालक डॉ. प्रमोद पाटील यांना पॅनेल चर्चेसाठी विशेष आमंत्रण देण्यात आले. त्यांनी भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधील महत्त्वपूर्ण सुधारणा आणि त्यांची अंमलबजावणी यावर सविस्तर मांडणी केली. त्यांनी बहुविषयक शिक्षण, उद्योगसंलग्न आणि कौशल्याधारित अभ्यासक्रम, शैक्षणिक गुणांकन हस्तांतरण (क्रेडिट मोबिलिटी), परिणामाधिष्ठित शिक्षण पद्धती, उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण या प्रमुख बाबींचा विशेष उल्लेख केला.
डॉ. पाटील यांनी नमूद केले की नूतन अभियांत्रिकीचे हे आंतरराष्ट्रीय करार राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या उद्दिष्टांशी सुसंगत असून भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील उत्कृष्ट शिक्षणमार्ग उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
या दौऱ्यात प्रतिनिधीमंडळाने व्हिएतनाम, फिलिपाइन्स, ऑस्ट्रेलिया आणि दुबई येथील २५ हून अधिक विद्यापीठांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून भावी शैक्षणिक सहकार्य व संशोधन भागीदारीसाठी नवी दालने उघडली.
या सर्व उपक्रमांबद्दल बोलताना डॉ. पाटील म्हणाले, “ही सहकार्यता जागतिक सहभाग, संशोधनातील उत्कृष्टता आणि संस्थेच्या दर्जावृद्धीसाठी एक परिवर्तनकारी पाऊल आहे.”
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे खजिनदार तसेच अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के यांनी या यशस्वी उपक्रमाबद्दल नूतन अभियांत्रिकी टीमचे कौतुक करताना म्हणाले, “नूतन अभियांत्रिकी नवोपक्रम, शाश्वतता आणि व्यापक जागतिक दृष्टीकोनावर आधारित शिक्षण परिसंस्था उभारत आहे. अशा उपक्रमांमुळे आमच्या विद्यार्थी–प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक संधी प्राप्त होतात.”
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय (बाळा) भेगडे, उपाध्यक्ष नंदकुमार शेलार, सचिव संतोष खांडगे, खजिनदार राजेश म्हस्के, सह सचिव विनायक अभ्यंकर, सदस्य गणेश खांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, रामदास काकडे, चंद्रकांत शेटे महेशभाई शहा, यादवेंद्र खळदे यांनी नूतन अभियांत्रिकीचे संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, कुलसचिव, अधिष्ठाते, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व कर्मचारीवर्गाचे या उल्लेखनीय आंतरराष्ट्रीय यशस्वी उपक्रमाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले.






