जलसंधारण अधिकारी संजय गायकवाड सेवानिवृत्त
तळेगाव दाभाडे :
जलसंधारण अधिकारी अभियंता संजय उत्तम गायकवाड ३२ वर्षांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेनंतर मंगळवारी (दि. ३१ डिसेंबर) सेवानिवृत्त झाले. या प्रसंगी आयोजित निरोप समारंभात जिल्हा जलसंधारण अधिकारी गौरव बोरकर आणि गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांच्या हस्ते संजय गायकवाड आणि त्यांच्या पत्नी सौ. विजया यांचा सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि निवृत्तीवेतन आदेश (पीपीओ) देऊन त्यांना गौरवण्यात आले.
यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी गौरव बोरकर म्हणाले, “पुणे जिल्ह्यातील बंधाऱ्यांच्या प्रकल्पांचे आव्हानात्मक काम संजय गायकवाड यांनी अत्यंत सचोटीने आणि कष्टपूर्वक पूर्ण केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील शेती व पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम झाले. त्यांच्या शासकीय सेवेतील कामगिरी, सामाजिक कार्य आणि विपश्यनेतील साधना सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.”
गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी गायकवाड यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत त्यांची संयमी अधिकारी म्हणून ओळख अधोरेखित केली. तसेच त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सत्कारास उत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले, “सेवानिवृत्तीचा क्षण प्रत्येकासाठी खास असतो. ३२ वर्षे ४ महिने राज्य शासनाच्या सेवेत काम करण्याची संधी मिळाली, याचा अभिमान आहे. यापुढे विपश्यना आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून कार्य करणार आहे.”
समारंभात कोल्हापूरचे ज्येष्ठ संगीतकार डॉ. अरुण कुलकर्णी, डॉ. नीरजा कुलकर्णी आणि तबलावादक संदेश खेडेकर यांचाही सन्मान करण्यात आला. हा सन्मान साहित्य कला सांस्कृतिक मंडळाचे माजी कार्याध्यक्ष ए. ए. खान यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब काळे यांनी केले, तर डॉ. पूनम गायकवाड यांनी आभार मानले.