स्त्रीला घरातील संस्काराचे केंद्र बनता आले पाहिजे : ह.भ.प. काजल काळे-पोतले
तळेगाव दाभाडे :
स्त्री ही मुलींपासून आजीपर्यंत विविध भूमिकांमध्ये वावरत असते. ती पुरुषाची शक्ती असते. मुलांसाठी आई सर्वस्व असते. त्यामुळे स्त्रीला घरातील संस्कारांचे केंद्रच म्हटले पाहिजे, असे प्रतिपादन व्याख्यात्या ह.भ.प. काजल काळे-पोतले यांनी केले.
हिंदविजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित हिंदमाता व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प काजल काळे-पोतले यांनी गुंफले. त्यांनी ‘स्त्री एक संस्काराचे केंद्र’ या विषयावर विचार व्यक्त केले. दरम्यान, सामाजिक सहयोग उपक्रम संस्थेला (कॅप) हिंदविजय भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी हिंदविजय पतसंस्थेचे संस्थापक अॅड. रविंद्रनाथ दाभाडे, संस्थेच्या अध्यक्षा विभावरी दाभाडे, उपाध्यक्ष अॅड. संजय वांद्रे, सचिव कैलास भेगडे, देवराम वाघोले, प्रकाश गायकवाड, गिरीश खेर, अनंता आंद्रे, निवृत्त तहसीलदार रामभाऊ माने, श्रीकृष्ण पुरंदरे, कॅप’च्या संस्थापिका नयना आभाळे, अध्यक्ष प्रदीप साठे, शरद सवाई, दिनेश भारद्वाज, प्रदीप लोखंडे, शेखर गानु, नेहा गानु, प्रज्ञा लाखंडे, कामीनी कडू, चेतना शहा, अशोक योनाळकर आदी उपस्थित होते.
काजल काळे -पोतले म्हणाल्या, की आपला साडेतीनशे वर्षाचा इतिहास पाहिला तरी लक्षात येते की स्त्री हीच कुटुंब, समाजासाठी महत्वाची भूमिका निभावत आलेली आहे. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी अशा स्त्रियांची उदाहरणे पाहिली, तरी आपण स्त्री शक्ती आहोत, याचा अभिमान बाळगला पाहिजे. मनाने खचून जाऊ नका, शरीर कमकुवत असले, तरी स्त्रीने मनाने खंबीर राहायला हवे. तरच आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडू शकाल. प्रथम स्त्रीनेच स्त्रीला समजून घेतले पाहिजे. आज न्यायालयात सर्वाधिक खटले हे सासू-सुनेच्या वादाचे आहेत. लग्न झालेल्या सुनेला मुलीसारखी वागणूक दिली तर नाते घट्ट व्हायला मदत होईल. पर्यायाने घरात आनंदाचे वातावरण राहील. मुलांना आयते देत गेल्यानेच संस्कारांचे केंद्र बदलत गेले. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून समाजात ताठ मानेने वावरायला शिकवा. असे झाल्यास स्त्रीच खऱ्या अर्थाने संस्कारांचे केंद्र ठरते.
पुरस्काराला उत्तर देताना नयना आभाळे म्हणाल्या, कॅप संस्थेच्या माध्यमातून आम्ही आदिवासी, गरीब, गरजू मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी काम करीत आहोत. पालकांचे मन परिवर्तन करून ही मुले शिक्षणासाठी तयार होत आहेत. आपल्याकडील वापरात नसलेल्या सुस्थितीत असलेल्या वस्तू संस्थेला दान केल्यास त्या वस्तू गरजू मुलांना उपयोगी पडतील.
सीमा कांचन म्हणाल्या, की समाजात वावरताना स्त्रियांनी विचार समृद्ध करावेत. स्त्रिया अनेक रूपात भेटतात. त्या पदोपदी संस्कार देत असतात. मात्र, ते विचार वेचता आले पाहिजेत.
सूत्रसंचालन सचिव कैलास भेगडे यांनी, तर आभार संचालक ज्ञानेश्वर नवले यांनी मानले
कार्यक्रमाचे नियोजन सुहास धस, रेवप्पा शितोळे, शामराव इंदोरे, व्यवस्थापक दत्तात्रेय कांदळकर, सचिन आरते, महेश दाभाडे, संदीप जवळेकर यांनी केले.