नूतन अभियांत्रिकी चे संचालक डॉ. प्रमोद पाटील यांना आयएसटीइ कडून सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालय शिक्षक पुरस्कार – महाराष्ट्र राज्य 2025 (राष्ट्रीय स्तर) प्रदान
तळेगाव दाभाडे :
नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी तळेगाव दाभाडे, पुणे यांचे संचालक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विद्या संकुलाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद पाटील यांना इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली तर्फे प्रतिष्ठेचा सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालय शिक्षक पुरस्कार – महाराष्ट्र राज्य 2025 (राष्ट्रीय स्तर) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार ५५व्या आयएसटीई राष्ट्रीय वार्षिक प्राध्यापक अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यात, श्री मनकुळा विनायगर अभियांत्रिकी महाविद्यालय, पुदुच्चेरी येथे २९ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदान करण्यात आला. देशभरातील ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि शैक्षणिक तज्ञांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
हा सन्मान डॉ. प्रमोद पाटील यांच्या अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा आणि 24 पेक्षा अधिक वर्षांचा अध्यापन व संशोधनाचा अनुभव, दूरदर्शी शैक्षणिक नेतृत्वाचा तसेच नवोपक्रम, गुणवत्ता वृद्धी आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षण पद्धतीसाठी केलेल्या अखंड प्रयत्नांचा गौरव करतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपली शैक्षणिक परिसंस्था अधिक बळकट केली असून एनईपी 2020 च्या उपक्रमांना गती दिली, उद्योग-शिक्षण सहकार्य वाढविले आणि संशोधन व संस्थात्मक उत्कृष्टतेची भक्कम संस्कृती विकसित केली आहे.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शसंजय (बाळा) भेगडे, उपाध्यक्ष नंदकुमार शेलार, सचिव संतोष खांडगे, खजिनदार तसेच अभियांत्रिकी च्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के, सहसचिव विनायक अभ्यंकर, सदस्य गणेश खांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, रामदास काकडे, चंद्रकांत शेटे, महेशभाई शहा, यादवेंद्र खळदे यांनी डॉ. पाटील यांचे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले.
अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के यांनी अभिनंदन व्यक्त करताना म्हटले “डॉ. प्रमोद पाटील यांना आयएसटीई ‘महाराष्ट्र राज्य सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयीन शिक्षक पुरस्कार – २०२५’ मिळाल्याबद्दल मला अत्यंत अभिमान व आनंद वाटतो. हा सन्मान त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्वाचे, शैक्षणिक प्रावीण्याचे आणि तांत्रिक शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी त्यांनी घेतलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतिक आहे. ही कामगिरी केवळ त्यांची वैयक्तिक सिद्धी नसून संपूर्ण एनएमआयई टी परिवार आणि नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळासाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या प्रगतीचा आणि परिवर्तनाचा प्रवास आणखी वेगाने पुढे जाईल, असा मला विश्वास आहे.”
हा सन्मान अभियांत्रिकी च्या च्या शैक्षणिक उत्कृष्टता आणि तांत्रिक शिक्षणातील नेतृत्वाच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. नवीन ऊर्जा आणि एकसंध दृष्टीकोनासह संस्था आपली प्रगती अधिक वेगाने आणि सातत्याने पुढे नेत राहील.






