डॉक्टर अशोक निकम यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन
तळेगाव दाभाडे :
दिव्यत्वाची जेथे प्रचिती- तेथे कर माझे जुळती!– अशोक वृक्षाच्या घनदाट छायेच्या सानिध्यात असलेला मी!– होय मित्रांनो- डिसेंबर 1973 ला मी– इंटरनशिप साठी तळेगाव जनरल हॉस्पिटलला दाखल झालो! जवळजवळ या गोष्टीला आज पन्नास वर्षे झाली आहेत पण- अगदी काल घडल्या सारखाच प्रत्येक प्रसंग- प्रत्येक क्षण आजही मी अनुभवतो आहे! त्यात निकमसर कसे अपवाद असतील!- सरांच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा आम्हाला उभारी यायची! सर अत्यंत कडवे शिस्तप्रिय- मितभाषी आणि महत्त्वाचे म्हणजे रुग्णांचे लाडके डॉक्टर!एक वेळ घड्याळाचा आठचा ठोका चुकेल पण- हॉस्पिटल मधील सरांच सकाळचं आगमन यात एकही क्षण इकडे किंवा तिकडे व्हायचा नाही! इतके वेळेच्या बाबतीत सर सतर्क असायचे! एक निगर्वी स्वभावाचा संशोधक सरांमध्ये मला नेहमीच दिसायचा! रुग्णांच्या बाबतीत सरांच्यात असलेला हळुवारपणा मी प्रत्यक्ष अनुभवलेला आहे! माझी सुविद्य पत्नी सौ विजया हिचे दोन्ही सिझर सरांनी ज्या पद्धतीने केलेत त्यात त्यांनी मला देवदूतांच च दर्शन दिल! एरवी पेशंटना हिमतीने हाताळणारा मी- पत्नीच्या सिझरच्या वेळी पुरता खचून गेलो होतो! माझ्या मनातील उलथा पालथ सरांच्या नजरेतून सुटली नाही! त्यांनी शांतपणे माझ्या हातावर हात ठेवून एक आश्वासक स्पर्श केला आणि ते म्हणाले- शांत रहा सगळ ठीक होईल! सरांच्या त्या संवेदनशील शब्दांनी प्रचंड आत्मविश्वासाची अनुभूती मी अनुभवली!- माझ्या पंधरा बाय वीस च्या छोट्याशा क्लिनिकच उद्घाटन ते 15 बेडचं भंडारी हॉस्पिटलच उद्घाटन- सरांच्या अध्यक्षतेखालीच झालेत! चि सोनाली- दिपाली यांनी विविध क्षेत्रातील मिळवलेल्या यशाच कौतुक असो- माझ्या विविध पुस्तकांचे प्रकाशन समारंभ असो वा दूरदर्शनवरील माझ्या गाजलेल्या मुलाखती असो- सरांचा पहिला कौतुकाचा फोन ऐकताना मला होणारा आनंद मी आजही शब्दात व्यक्त करू शकत नाही!नोबेल पारितोषिक विजेत्या रवींद्रनाथ टागोरांच्या कथा नायकाला कोणीतरी सांगितलं की- तुझ्या गळ्यातील लोखंडी साखळीला परीसाच्या दगडाने स्पर्श केला की- ती सोन्याची होईल! सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो युवक त्या परिसाच्या शोधात खूप हिंडला! त्याने अनेक दगड आपल्या साखळीला लावून बघितले पण साखळी काही सोन्याची झाली नाही! मध्यरात्रीपर्यंत त्याने खूप प्रयत्न केले पण त्याला यश काही मिळालं नाही! अखेर दमून भागून तो झोपी गेला! सकाळी उठला तर काय आश्चर्य!- त्याची साखळी सोन्याची झाली होती-पण नेमक्या कोणत्या दगडाच्या स्पर्शाने तिच रूप पालटल हे त्याच्या लक्षात आल नाही! मित्रांनो- माझ्या बाबतीत मात्र- निकम सरांच्या रूपाने मला परिसाचा स्पर्श झाला आणि माझं जीवन उजळून निघाल! आजही- एखादी कुशल स्त्रीरोग तज्ञ व्यक्ती माझ्यासमोर जेव्हा जेव्हा येते- तेव्हा तेव्हा मला प्रकर्षाने स्मरण होते ते- आदरणीय आपल्या निकम सरांच! आज सरांचं अस्तित्व संपलं असलं तरी- आठवणी मात्र माझ्या मनाच्या शिंपल्यात अजूनही तेवढ्याच ताज्या आणि टवटवीत आहेत! खरंतर- आदरणीय निकम सरांचे सर्व सद्गुण प्रत्येक डॉक्टरांनी प्रत्यक्ष आपल्या कृतीत उतरवणे हीच खऱ्या अर्थाने सरांना समर्पित केलेली आपली श्रद्धांजली ठरेल! निकम सरांच्या असं अचानक जाण्याचं अतिव दुःख सोसण्याची शक्ती सरांच्या शोकाकुल परिवाराला परमेश्वर देवो! त्यांच्या स्वर्गस्थ आत्म्यास चिरशांती प्राप्त होओ हीच त्या निर्गुण निराकार परमेश्वर चरणी प्रार्थना!- लायन डॉक्टर शालिग्राम भंडारी- आय एम ए तळेगाव तथा लायन्स क्लब तळेगावचे सर्व सन्माननीय सभासद- तळेगाव दाभाडे पुणे.






