बेकायदेशीर जमिन खरेदी प्रकरण: तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील शेतकरी कुटुंबाच्या ताबेवहिवाटीच्या जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्रातून वगळलेल्या तीन जणांना आरोपी म्हणून समाविष्ट करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी व्ही. आर. डोईफोडे यांनी दिले आहेत. तब्बल दहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर हा निर्णय देण्यात आला असून, शितल तेजवानी, संध्या सुर्यवंशी (दोघी रा. पिंपरी) आणि विनय विवेक आरानाह (रा. पुणे) यांना आरोपी करण्यात आले आहे. या तिघांना 17 फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दहा वर्षांच्या संघर्षानंतर न्याय
तक्रारदार सुभाष खळदे आणि त्यांचे वकील अॅड. सुभाष देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, खळदे कुटुंबाने त्यांच्या ताबेवहिवाटीच्या जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी प्रकरणी सात जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, वडगाव मावळ पोलिसांनी प्रेम चेलाराम तिलोकचंदानी, खुबो मोहनदास मंगतानी, भगवान ललवानी (सर्व रा. पिंपरी) आणि मिलिंद पोखरकर (रा. तळेगाव) या चौघांविरुद्धच आरोपपत्र दाखल केले. यावर शेतकरी कुटुंबाने आक्षेप घेत न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने याची दखल घेत पोलिसांनी वगळलेल्या तिघांनाही आरोपी म्हणून समाविष्ट करण्याचे आदेश दिले.
या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल
न्यायालयाच्या आदेशानुसार, नव्याने आरोपी ठरवण्यात आलेल्या शितल तेजवानी, संध्या सुर्यवंशी आणि विनय विवेक आरानाह यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 420 (फसवणूक), 464, 467, 468, 472 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
१७ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश
न्यायालयाने या तिघांना 17 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले असून, त्यानुसार वडगाव मावळ पोलिसांनी आरोपींना नोटीस बजावली आहे. या निर्णयामुळे शेतकरी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून, सत्य बाहेर आल्याची प्रतिक्रिया तक्रारदारांनी दिली आहे.
– अॅड. सुभाष देसाई, तक्रारदारांचे वकील
“पोलिसांनी अपूर्ण आरोपपत्र दाखल केल्याने शेतकरी कुटुंबावर अन्याय झाला होता. न्यायालयाच्या आदेशामुळे सत्य उघड झाले आणि शेतकरी कुटुंबाला न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.”