बंद झालेली जांभवली एसटी बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी
नाणे:
मावळ तालुक्यातील पश्चिम भागातील कामशेत.नाणे. गोवित्री.कांब्रे.थोरण . जांभवली गावामध्ये जाणारी एसटी बस सेवा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी जांभवली थोरण भागातील ग्रामस्थांनी केली आहे. जांभवली पासून कामशेत. तळेगाव. लोणावळा. वडगाव. या मार्गावर प्रवासी वाहतुकीचे सार्वजनिक( एसटी) बस सेवाच नाही त्यामुळे तळेगाव ते जांभवली ही एसटी बस सेवा कोरोना काळापासून बंदच आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना व स्थानिक कामगार शेतकरी यांची जाण्या येण्याची गैरसोय होत आहे. जांभवली ला पूर्वी मुक्कामी येणारी एसटी बस सेवा सुरू व्हावी अशी मागणी पाच वर्षापासून नागरिक करत आहे. या मार्गावर एसटी सेवा नसल्यामुळे या भागातील प्रवाशांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. आरोग्य सेवेसाठी गावाबाहेर जावे लागते मात्र वाहतुकीच्या गैरसोयीमुळे जेष्ठ नागरिक व रुग्णांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो अनेकांचे आरोग्य त्यामुळे धोक्यात आले आहे. या भागातील कामगार कामानिमित्त कामशेत, वडगाव,लोणावळा, तळेगाव तसेच इतर ठिकाणी जावे लागते मात्र एसटी बसची सोय नसल्याने त्यांना वेळेवर कामावर पोहोचणे कठीण होते त्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न उभा राहत असून परिणामी कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडले आहे. सार्वजनिक एसटी सेवा नसल्यामुळे महिलांसाठी हे धोकादायक ठरत असून विशेषतः संध्याकाळच्या वेळी सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. शासन व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाय योजना कराव्यात अशी एक मुखी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. या संदर्भात आमदार सुनील शेळके,जिल्हाधिकारी,मावळचे तहसीलदार,तळेगाव आगर प्रमुख यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.






