अल्पवयीनांवरील अत्याचारांवर कठोर कारवाईची अखंड मराठा समाजाची मागणी
वडगाव (मावळ) :
मावळ तालुक्यासह संपूर्ण राज्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांत चिंताजनक वाढ होत असून, या अमानवी गुन्ह्यांवर शासनाने कठोरात कठोर भूमिका घ्यावी, अशी ठाम मागणी अखंड मराठा समाज, मावळ यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयात निवेदनाद्वारे करण्यात आली. सातत्याने घडणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नुकतीच शिरगाव–परंदवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण मावळ तालुका हादरून गेला आहे. यापूर्वी कोथुर्ण गावातही अशाच स्वरूपाची धक्कादायक घटना घडली होती. याशिवाय नाशिक जिल्ह्यातील माळेगाव परिसरात तसेच अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अखंड मराठा समाजाने तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर डान्सबार आणि अंमली पदार्थांच्या खुलेआम विक्रीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. शासनाने बंदी घातली असतानाही काही ठिकाणी डान्सबार सुरू असून, गांजा व इतर अंमली पदार्थांची सर्रास तस्करी होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. माध्यमांमध्ये याबाबत वारंवार बातम्या प्रसिद्ध होऊनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर सदर निवेदन माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करून कायद्यात आवश्यक ते कठोर बदल करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. अल्पवयीनांवरील अत्याचार करणाऱ्या आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटले चालवून तीन ते चार महिन्यांच्या आत निकाल देत मृत्युदंडाची शिक्षा ठोठावावी, अशी ठाम भूमिका अखंड मराठा समाजाने मांडली आहे. कठोर शिक्षा झाल्यासच अशा गुन्ह्यांना आळा बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
निवेदन सादर करताना नरेंद्र मुर्हे, दत्तात्रेय आरगडे, विकास घोटकुले, तन्वी शेवकर, दिपाली तांबे, सायली बोत्रे.भाऊसाहेब ढोरे, गणेश भेगडे, सुनील वाजे, संदीप कल्हाटर, ह.भ.प. संतोष महाराज शेलार, भाऊसाहेब हुलावळे . मोनिका भरत हुलावळे. सिमा संतोष भानुसघरे बाळासाहेब रामचंद्र शिंदे.कबीर काकडे.यांच्या सह मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.






