आळंदीमध्ये महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
आळंदी, ता. १० :
आळंदी येथील श्री नरसिंह सरस्वती मेडिकल फाउंडेशनचे “इंद्रायणी हॉस्पिटल”, “कॅन्सर इन्स्टिट्यूट” आणि “प्रयास फाउंडेशन” यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग जनजागृती व प्रतिबंधात्मक कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मंगळवार, दि. ९ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आले.

हे शिबिर ग्रामीण रुग्णालय, पोलिस स्टेशन मागे, भाजी मंडई शेजारी, आळंदी येथे सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत पार पडले. शिबिरामध्ये विशेषतः HPV (एच.पी.व्ही.), DNA (डी.एन.ए.) टेस्टिंग यांसारख्या महत्त्वपूर्ण तपासण्या पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या.
या शिबिराला सकाळी ११:३० ते दुपारी १ वाजेपर्यंत महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दुपारी २ ते ४ या वेळेत महिलांची संख्या अधिक वाढली. आजूबाजूच्या परिसरातील तसेच आळंदी येथील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत सेवांचा लाभ घेतला.
शिबिर यशस्वी करण्यासाठी कॅन्सर इन्स्टिट्यूट, प्रयास फाउंडेशन व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व मेडिकल स्टाफ यांनी विशेष मेहनत घेतली.
महिलांच्या आरोग्यविषयक तक्रारी निवारणार्थ आणि जनजागृतीसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले.
या मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून महिलांना आरोग्याबद्दल सजग होण्यासाठी आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून प्रतिबंध करण्यासाठी मौल्यवान संदेश देण्यात आला. आयोजक संस्थांच्या वतीने आळंदी व परिसरातील महिलांना भविष्यातही अशा शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.






