देशभर गाजलेल्या NEET घोटाळ्याची धागेदोरे तळेगावपर्यंत; मनीषा मांढरे चर्चेत
तळेगाव दाभाडे :
देशभरात खळबळ उडवणाऱ्या NEET पेपर लिकेज प्रकरणात आता पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडेचे नाव समोर आल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेली मनीषा गुरुनाथ मांढरे ही तळेगाव दाभाडे येथील मूळ रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा मांढरे ही तळेगावातील बालविकास विद्यालयाची माजी विद्यार्थिनी असून शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत हुशार आणि अभ्यासू म्हणून तिची ओळख होती. बॉटनी विषयात विशेष प्राविण्य मिळवल्यानंतर तिने पुढे इंद्रायणी महाविद्यालयात प्राध्यापक पदासाठी मुलाखत दिली होती. मात्र, व्यवस्थापनाने दुसऱ्या उमेदवाराची निवड केल्यानंतर तिने पुण्याकडे मोर्चा वळवल्याचे बोलले जात आहे.
यानंतर मनीषाने पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये ज्युनिअर प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या तिच्या अध्यापनशैलीची मोठी चर्चा होती. सूत्रांच्या माहितीनुसार, NTA पेपर सेटिंग कमिटीशी संबंधित काही व्यक्तींशी तिचे निकटचे संबंध असल्याची चर्चा रंगत आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी संबंधितांमध्ये वाद झाल्याच्याही चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहेत.
दरम्यान, मनीषाच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबाबतही विविध माहिती समोर येत आहे. तिचे वडील इंदोरी, मावळ येथील कॅडबरी कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत होते. तळेगावातील इंद्रायणी कॉलनी परिसरात त्यांचा बंगला असल्याचे सांगितले जाते.
या संपूर्ण प्रकरणात मनीषाच्या राहणीमानाबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्राध्यापकाच्या नोकरीच्या तुलनेत तिची जीवनशैली अत्यंत आलिशान असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगली आहे. विशेष म्हणजे, अद्याप तिच्या तळेगावातील निवासस्थानी कोणतीही अधिकृत छापेमारी झालेली नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, NEET पेपर लिकेज प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत असून तपास यंत्रणा आता आणखी कोणाच्या शोधात आहेत, याकडे देशभरातील विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष लागले आहे.






